Short film News : तरुणांमध्ये लघुपटांची क्रेझ

Short film News : तरुणांमध्ये लघुपटांची क्रेझ

पुणे : तरुणाई माहितीपट बनविण्यापेक्षा लघुपट निर्मितीकडे वळली असून, तरुणांमध्ये लघुपट निर्मितीची क्रेझ अधिक असल्याचे दिसून येत आहे. एखाद्या संस्थेची, व्यक्तीची किंवा इतर माहिती माहितीपटातून पोचविण्यापेक्षा स्वत:ला व्यक्त होण्याचे, मनाला भावेल आणि समाजाला दिशा देणार्‍या विषयांच्या मांडणीची मुक्त संधी देणार्‍या लघुपटांच्या निर्मितीवर तरुण-तरुणींचा कल आहे. त्यामुळे आताच्या घडीला यू-ट्यूब चॅनेल असो वा फेसबुक पेजवर तरुणांचे लघुपट गाजत असून, तरुणाईने तयार केलेले लघुपट विविध महोत्सवांमध्ये झळकत आहेत. लघुपटांच्या दुनियेने तरुणांना नवीन ओळखही दिली आहे.

माहितीपटांची फारशी निर्मिती नाही

पूर्वीपासूनच माहितीपट हा प्रकार चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात अस्तित्वात आहे. माहितीपट हा कलाविश्वातील दुर्लक्षित असा भागच म्हणावा लागेल. माहितीपट बनवणारा आणि तो बघणारा एक खास असा वर्ग आहे. माहितीपट वास्तववादी किंवा सत्यघटनेवर आधारित असतात. माहितीपट कुठल्याही थिएटरमध्ये प्रदर्शित होत नाहीत. त्या तयार करण्यामागचा उद्देश सर्वसामान्यांपर्यंत वास्तव पोचवणे, त्यांना माहिती देणे हा असतो. त्या पद्धतीनेच माहितीपट तयार केले जातात. त्यामुळे माहितीपटांची फारशी निर्मिती होताना दिसत नाही.

बोटावर मोजक्याइतकेच कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शकच विशिष्ट विषयावर दृष्टिक्षेप टाकण्यासाठी माहितीपट बनवतात. त्यामुळे कलाविश्वातच आणि खासकरून तरुणांनी माहितीपट हा प्रकार फारसा हाताळलेला नाही आणि माहितीपट तयार करणारे मोजकेच तरुण-तरुणी आहेत. 10 लघुपटांच्या तुलनेत फक्त 1 ते 2 माहितीपट तयार केला जातो आणि तो यू-ट्यूब चॅनेल किंवा विविध सोशल मीडियावर प्रदर्शित केला जातो.

ज्वलंत विषयावर भाष्य

लघुपट निर्मिती करणार्‍या तरुणांची संख्या मोठी आहे. व्यसनाधीनता असो वा महिला सुरक्षितता… अशा विविध ज्वलंत सामाजिक विषयांवर भाष्य करणार्‍या लघुपटांची निर्मिती आताच्या घडीला तरुणाईकडून केली जात असून, तरुणांचे हे लघुपट विविध चित्रपट महोत्सवांमध्ये गाजत आहेत. महाविद्यालयीन तरुणांसह नोकरदार तरुणाई वेळ काढून लघुपट तयार करीत आहे. सध्याच्या घडीला दर महिन्याला 40 ते 50 लघुपट तयार केले जात असून, 20 ते 35 वयोगटांतील तरुणाई लघुपटांच्या निर्मितीकडे वळली आहे. यू-ट्यूब चॅनेलसह विविध सोशल मीडिया व्यासपीठांवर किंवा महोत्सवांत, स्पर्धांमध्ये लघुपटांना पसंती मिळत असून, त्यातून तरुणांना आर्थिक फायदाही होत आहे. कलेची आवड असलेल्या तरुण-तरुणींना यातून करिअरची नवी वाट सापडली आहे.

महितीपट तयार करण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे आम्ही लघुपट निर्मितीवर भर दिला आहे. लघुपटांना फेसबुक, यू-ट्यूब चॅनेल, विविध संकेतस्थळांवर पसंती मिळत आहे. सोशल मीडियावर तरुणांचे लघुपट गाजत असून, सोशल मीडियावर लघुपटांचे टीझर, रील्स आणि व्हिडीओंनाही पसंती आणि दाद मिळत आहे.

– सोमेश्वर जाधव, कलाकार

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news