धक्कादायक ! प्रेमप्रकरणातून तरुणाचा खून : पतीसह अल्पवयीन साथीदारांविरुद्ध गुन्हा

धक्कादायक ! प्रेमप्रकरणातून तरुणाचा खून : पतीसह अल्पवयीन साथीदारांविरुद्ध गुन्हा
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पत्नीशी असलेल्या विवाहबाह्य प्रेमसंबंधातून बारामतीतील तरुणाला बेदम मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. पोलिसांनी याप्रकरणी तपास करून विवाहितेच्या पतीसह अल्पवयीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संग्राम हनुमंत साळुंके (वय 22, रा. वडकेनगर, बारामती, जि. पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नितीन रेणुसे, आदित्य गवळी आणि त्यांचे साथीदार अशा पाच ते सहा जणांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 2 डिसेंबर 2023 रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडली होती. सुरुवातीला याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर तपासाअंती हा गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिस उपनिरीक्षक शशांक जाधव यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संग्राम याची धनकवडीतील आंबेगाव पठार परिसरात राहणार्‍या एका विवाहितेशी ओळख झाली होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. तिच्या पतीला याबाबतची माहिती मिळाली होती. संग्राम विवाहितेला भेटण्यासाठी पुण्यात येणार असल्याची माहिती तिचा पती नितीन रेणुसेला मिळाली होती. तो बिबवेवाडीतील किया सर्व्हिस सेंटरजवळ 2 डिसेंबर 2023 रोजी आला होता. आरोपी रेणुसे, गवळी आणि त्याच्या इतर साथीदारांनी पाळत ठेवली होती. त्याला दुचाकीवर बसवून अप्पर इंदिरानगर परिसरात गॅस गोदामाजवळ नेले.

मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. वैद्यकीय अहवालात त्याचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे उघड झाले. तपासात संग्रामवर एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्याला बेदम मारहाण केल्याचे चौकशीत उघड झाले. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक निकुंभ पुढील तपास करत आहेत.

…असा झाला खुनाचा उलगडा

नितीन रेणुसे आणि त्याच्या साथीदारांनी संग्राम याला बेदम मारहाण केली. त्यानंतर रेणुसे याच्या पत्नीने संग्रामला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी विचारले तेव्हा तिने सांगितले की, याला दारू आणि गांजाचे व्यसन आहे. तो माझ्याकडे घरी आला होता. तेव्हा त्याने डोके दुखत असल्याचे सांगितले. त्यानंतर तो चक्कर येऊन पडला. मात्र, त्याचा मृत्यू झाला. तेव्हा शवविच्छेदन अहवालात मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे पुढे आले. दरम्यान, दुसरीकडे पोलिसांना याबाबत संशय वाटत होता. आरोपींच्या बोलण्यातील विसंगती, तांत्रिक विश्लेषण आणि परिस्थितीजन्य पुराव्यांचे अवलोकन करून खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावला.

हा प्रकार समोर आल्यानंतर याबाबत सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. तपासादरम्यान संबंधित व्यक्तीचा खून झाल्याचे पुढे आले. त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. प्रेमसंबंधातून तरुणाचा खून केला आहे.

– विनय पाटणकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बिबवेवाडी

 हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news