‘रुपी’कडून 93 कोटी 52 लाखांचे वाटप; खात्यातील ठेवींचे 792 कोटींचे वाटप पूर्ण | पुढारी

‘रुपी’कडून 93 कोटी 52 लाखांचे वाटप; खात्यातील ठेवींचे 792 कोटींचे वाटप पूर्ण

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अवसायनात काढण्यात आलेल्या येथील रुपी को-ऑप बँकेकडून 14 हजार 919 ठेवीदारांची सुमारे 93 कोटी 52 लाख रुपयांइतकी रक्कम ही संबंधित ठेवीदारांच्या दुसर्‍या बँकेतील खात्यांमध्ये जमा करण्यात आलेली आहे. तसेच, उर्वरित ठेवींची रक्कमही वितरित करण्याचे काम सुरू असल्याची माहिती रुपी बँकेचे अवसायक धनंजय डोईफोडे यांनी दिली. म्हणजेच आत्तापर्यंत रुपी बँकेने 792 कोटी रुपये ठेवीदारांना परत केल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या ठेवी विमा महामंडळा (डीआयसीजीसी) कायद्यामधील बदलाला अनुसरून प्रशासकांच्या कारकीर्दीत ठेवीदारांना त्यांच्या ठेवींपैकी जास्तीत जास्त पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेव रकमा मुदतीत परत करणे हे ठेव विमा महामंडळावर बंधनकारक करण्यात आले आहे. ठेवीदारांच्या संरक्षित पाच लाखांपर्यंतच्या ठेवीसंदर्भात बँकेला ठेव परत मिळण्याबाबत प्राप्त झालेल्या अर्जांच्या अनुषंगाने ठेव विमा महामंडळाने फेब्रुवारी 2022 मध्ये 700 कोटी 44 लाख रुपयांच्या ठेवींची रक्कम संबंधित ठेवीदारांना वितरित करण्यासाठी उपलब्ध केली होती. त्यापैकी 699 कोटी 81 लाख रुपये संबंधित ठेवीदारांना परत करण्यात आली आहे.

मात्र, त्यातील काही तांत्रिक अडचणींमुळे वितरित करावयाची शिल्लक राहिलेली रक्कम 63.56 लाख रुपये विमा महामंडळाने परत घेतली आहे. म्हणजेच एकूण 699 कोटी 18 लाख रुपये आतापर्यंत वितरित झाले होते. दुसर्‍या टप्प्यात 155 कोटी 43 लाख रुपयांच्या ठेवी परत मिळण्याबाबत एकूण 16 हजार 396 अर्ज प्राप्त झाले होते. त्याचे लेखापरीक्षण पूर्ण झाल्यानंतर संबंधित लेखापरीक्षकांनी त्यांचा अहवाल ठेव विमा महामंडळाकडे दाखल केला होता. त्या अनुषंगाने ठेव विमा महामंडळाने 19 जानेवारी 2024 रोजी 15 हजार 337 अर्जासंदर्भात 96 कोटी 68 लाख 16 हजार 752 रुपयांइतकी रक्कम संबंधित ठेवीदारांना वितरित करण्यासाठी उपलब्ध केली होती. त्यापैकी 14 हजार 919 ठेवीदारांची 93 कोटी 52 लाख रुपयांइतकी रक्कम या ठेवीदारांच्या दुसर्‍या बँकेतील खात्यांमध्ये जमा झालेली आहे. उर्वरित रक्कम वितरित करण्याचे काम चालू असल्याचे डोईफोडे यांनी सांगितले.

हेही वाचा

 

Back to top button