पुणे : शिवसेनेचे हडपसर मतदारसंघावर लक्ष!

शिवसेना
शिवसेना

पुणे : पुढारी वृत्तसेवा

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या सभेमुळे हडपसरमधील शिवसैनिकांची मरगळ दूर झाली असून, त्यांच्यात उत्साही वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा परीणाम येत्या महापालिका निवडणुकीत दिसून येण्याची शक्यता असून, या भागातील शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शिवसेनेची पकड जुनीच

हडपसर विधानसभा मतदारसंघ हा पूर्वाश्रमी समाजवादी, नंतर काँग्रेसच्या ताब्यात राहिला. भाजप-शिवसेना युतीचे सरकार राज्यात आले, तेव्हा सूर्यकांत लोणकर हे 1995 मध्ये पुणे कॅन्टोन्मेंट (म्हणजे सध्याचे हडपसर) विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले. त्या निवडणुकीत पुण्यातील सहापैकी तीन आमदार शिवसेनेचे तर दोघे भाजपचे होते. या विधानसभा मतदारसंघात भगवा फडकाविल्यानंतर कोंढवा, महंमदवाडी, हडपसर परिसरात शिवसेनेचे नगरसेवक निवडून येत गेले. शिवसेनेने आपली पकड हळूहळू हडपसर मतदारसंघात मजबूत केली.

शिवसेनेच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांनीही आता या मतदारसंघात आपले लक्ष घातले. शिवसेना नेते रवींद्र मिर्लेकर, डॉ. नीलम गोर्‍हे, उदय सामंत व सध्याचे विद्यमान नामदार सचिन अहीर यांनी शहर संपर्कप्रमुख म्हणून पुणे शहराच्या पूर्व भागातील हडपसर विधानसभा मतदारसंघाची संघटनात्मक बांधणी भक्कम केली. पुणे महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत भाजपच्या झंझावातामध्ये शिवसेनेसह विरोधी पक्षांच्या नगरसेवकांची संख्या घटली. महंमदवाडी व कोंढवा येथील शिवसेनेच्या नगरसेवकांनी आपला गड भाजपच्या झंझावातात ही कायम राखला होता. महंमदवाडी येथील नगरसेवक नाना भानगिरे यांनी आमदारालाही लाजवेल अशी विकासकामे केल्याची स्तुती संपर्कप्रमुख अहीर यांनी केली.

आगामी निवडणुकीमध्ये शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येण्यासाठी संघटनात्मक बांधणीवर जोर देण्यात येत आहे. शिवसेनेने संघटनेत शाखा प्रमुखापासून ते शहर प्रमुखांपर्यंत सर्व पदाधिकाऱ्यांना आपले काम नेमून दिलेले आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पूर्ण झाल्या आहेत. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने सोशल मिडीयाचा वापरही वाढविण्यात आला आहे. संजय राऊत यांच्या सभेतील गर्दीमुळे शिवसैनिकांमधील उत्साह वाढला असल्याचे मत शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी व्यक्त केले. स्थानिक नगरसेवक नाना भानगिरे यांनी प्रभागात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. त्याचा फायदा आगामी निवडणुकीत होईल, असे या नेत्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news