Shivajinagar Court Security Audit: शिवाजीनगर न्यायालयात गांजा प्रकरणानंतर खळबळ; सुरक्षा ऑडिटचे आदेश, ड्रग्ज सेवन करणारेही पोलिसांच्या रडारवर

आरोपींना मुक्त भेटी, मोबाईल वापर आणि अमली पदार्थांची देवाणघेवाण उघड; न्यायालय परिसरात कडक तपासणी व व्हिडिओ कॉन्फरन्स सुनावण्यांवर भर
Court Security Audit
Court Security AuditPudhari
Published on
Updated on

पुणे: शिवाजीनगर न्यायालयात तारखेला आणलेल्या आरोपींना नातेवाइकांची मुक्त भेट, वाहनात बसून गप्पा, हॉटेलमधून जेवण, मोबाईलवर संभाषण आणि अगदी अमली पदार्थांची देवाणघेवाण होत असल्याचे प्रकार समोर आले होते. त्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्‍त अमितेश कुमार यांनी संताप व्यक्त करीत न्यायालय परिसराचे तातडीने सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

Court Security Audit
Home Loan Insurance Claim: वैद्यकीय तपासणीशिवाय पॉलिसी; दावा फेटाळणाऱ्या विमा कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका

न्यायालय आवारातील शौचालयामध्ये आरोपीला गांजा पुरविल्‍याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आल्‍यानंतर पोलिस आयुक्‍तांनी हे आदेश दिले आहेत. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना चकवा देत आरोपीच्या मित्राने थेट बाथरूममध्ये गांजा पोहचविला होता. त्यामुळे कोर्ट आवारातील सुरक्षेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. हा प्रकार आयुक्तांच्या कानावर जाताच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. ‘न्यायालयासारख्या अतिसंवेदनशील ठिकाणी आरोपीपर्यंत अमली पदार्थ पोहचतोच कसा? अशी हिंमत होतेच कशी?’ याचाच शोध घेण्यासाठी न्यायालयतील आरोपींच्‍या व त्‍यांना भेटण्यास येणाऱ्या नातेवाइकांच्‍या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

Court Security Audit
Pune Zilla Parishad Ward Committees: पुणे जिल्हा परिषदेत ७३ प्रभाग समित्या पुन्हा स्थापन; ग्रामीण विकासकामांवर नियमित देखरेख

या प्रकरणात आरोपीसह गांजा पुरविणाऱ्या व्यक्तीवरही गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालय परिसरात आरोपींसाठी तयार झालेली 'मोकळीक' मोडून काढण्यासाठी पोलिस प्रशासनाने व्यापक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. आरोपींना प्रत्येक वेळी प्रत्यक्ष न्यायालयात आणण्याऐवजी शक्य तितक्या सुनावण्या दृकश्राव्य प्रणालीद्वारे (व्हिडीओ कॉन्फरन्स) घेण्याबाबतही जास्‍तीत जास्‍त प्रयत्‍न करण्यात येणार आहे.

Court Security Audit
Ajit Pawar Padma Vibhushan: अजित पवारांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ देण्याची मागणी; आमदार विक्रम काकडेंचे अमित शहांना निवेदन

याशिवाय न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरील तपासणी अधिक कठोर करण्यात येणार आहे. मेट्रोच्या कामामुळे आणि अन्य कारणांमुळे सुरक्षेत आलेली शिथिलता दूर करून प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी केली जाणार आहे. पान, तंबाखू, अमली पदार्थ तसेच संशयास्पद वस्तू न्यायालयात नेण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिस प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत इशारा देत न्यायालय परिसरात अत्यंत कडक तपासणी आणि शिस्त राखण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालय परिसरातील सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

Court Security Audit
Pune Waste Processing Project: पुणे महापालिकेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पात १२८ कोटींची बचत; निविदा दरात मोठी कपात

खरेदी करणारे नव्हे, तर सेवन करणारेही रडारवर

अमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेल्या तरुण पिढीला बाहेर काढण्यासाठी आणि ड्रग्जचे रॅकेट समूळ नष्ट करण्यासाठी पुणे पोलिसांनी आता कडक कारवाईचा इशारा दिला आहे. आत्तापर्यंत केवळ ड्रग्ज विकणाऱ्या पेडलर्स आणि सप्लायर्सवर कारवाई होत होती. आता थेट 'मागणी करणारे' म्हणजेच प्रत्यक्ष अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवरही मोठा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. ड्रग्जची मागणी आणि पुरवठा अशा दोन्ही साखळ्या एकाच वेळी उद्ध्वस्त करण्याचा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. एनडीपीएस कायद्यातील कलम ६४(ए) अंतर्गत पोलिस प्रशासनाने व्यसनाधीन व्यक्तींना एक मोठी संधी देखील उपलब्ध करून दिली आहे. कारवाई झालेल्या आरोपींना व्यसनमुक्ती केंद्रात जाऊन उपचार घेण्याचा पर्याय दिला जात आहे. आरोपींनी व्यसनमुक्ती केंद्रात जाऊन महिनाभराचे उपचार पूर्ण केल्यास, पोलिस प्रशासन त्यांच्याबाबत सकारात्मक भूमिका घेईल. मात्र, ज्यांनी ही संधी नाकारली किंवा न्यायालयात सहकार्य केले नाही, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.

न्यायालयाच्या आवारात रील्स

तारखेसाठी आलेल्या काही गुन्हेगारांनी न्यायालयाच्या परिसरात रील्स काढल्याचे प्रकार समोर आले आहेत. या प्रकाराची देखील पोलिस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news