

पुणे : पुढारी वृत्तसेवा
स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आणि प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने पद्मश्री शीतल महाजन (राणे) हिने नऊवारी साडी नेसून पुण्यातील हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर येथे पॅरामोटरच्या साहाय्याने सहा हजार फुटांवरून पॅराजम्पिंग केले. अशा प्रकारे पॅरामोटरमधून पॅराजम्प करणारी ती पहिलीच भारतीय महिला असून हा तिचा राष्ट्रीय विक्रम आहे.
याबाबत शीतल महाजन म्हणाली, की सर्वसामान्य कुटुंबातून स्कायडायव्हिंग खेळात (पॅराशूट जम्पिंग) पुढे येत आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या स्पर्धांत मी सहभागी झाले आहे. आतापर्यंत माझ्या नावावर 18 राष्ट्रीय आणि सहा जागतिक विक्रम प्रस्थापित आहेत. जगातील सात खंडांत स्कायडायव्हिंग करणारी मी पहिली भारतीय महिला आहे. याची दखल घेत फेडरेशन ऑफ एरोनॉटिकल इंटरनॅशनल यांनी माझा सबिहा गोकसेन सुवर्णपदक देऊन सन्मान केला आहे.
आतापर्यंत साडी घालून मी भारताबाहेर अनेक ठिकाणी स्कायडायव्हिंग केले. परंतु माझी कर्मभूमी आणि जन्मभूमी असलेल्या पुणे शहरात नऊवारी साडी नेसून पॅरामोटरमधून पॅराजम्पिंग केल्याने ही विशेष पॅराजम्प माझ्यासाठी अविस्मरणीय ठरली आहे.
पॅरामोटरचे पायलट रॉन मेनेज हे एक पॅरामोटर इन्स्ट्रक्टर आहेत. यांच्या पॅरामोटरमधून आम्ही जमिनीपासून आकाशात पाच हजार फुटांवर गेलो. त्या ठिकाणी पॅरामोटरमधून मी बाहेर पडत आकाशात पक्ष्यांसारखी झेप घेतली. जमिनीच्या दिशेने मी वेगात येत असतानाच साडेतीन हजार फूट उंचीवर मी पॅराशूट उघडले. अशा प्रकारे पॅरामोटरमधून पॅराशूट जम्प करणारी मी पहिली भारतीय महिला ठरले आहे. या उपक्रमासाठी ग्लायडिंग सेंटर, हडपसरचे अधिकारी शैलेश चारभे यांचे विशेष सहकार्य लाभले.