PMPML Double Decker Bus: पुणेकरांसाठी डबल डेकर बसची सफर; पीएमपीच्या ताफ्यात येणार २५ नव्या बस

मार्ग, संचलन आणि देखभालीचे योग्य नियोजन न झाल्यास डबल डेकर बस ठरू शकतात ‘पांढरा हत्ती’
PMPML Double Decker Bus
PMPML Double Decker BusPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूकव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पीएमपी प्रशासन आगामी काळात २५ नवीन डबल डेकर बस ताफ्यात आणणार आहे. मात्र, या बस रस्त्यावर उतरवण्यापूर्वी योग्य संचलन नियोजन, मार्गांची नीट पाहणी आणि देखभालीची शेवटपर्यंतची खबरदारी घेणे गरजेचे आहे; अन्यथा त्या पांढरा हत्ती ठरतील, असा सूर शहरातील प्रवासीतज्ज्ञांनी दैनिक ‌'पुढारी‌'शी बोलताना व्यक्त केला.

PMPML Double Decker Bus
Maharashtra Rainfall: राज्यात पावसाचे असमान वितरण; १९० तालुके सरासरीच्या खाली

पीएमपीच्या ताफ्यात १९९३ बस आहेत. त्यापैकी जवळपास १८३४ बस मार्गावर असतात. अन्य बस देखभाल दुरुस्ती, ब्रेकडाऊनअभावी बंद असतात. मात्र, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए भागातील प्रवाशांची संख्या पाहता या बस अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने आगामी काळात दोन हजारपेक्षा अधिक नव्या बस खरेदी करण्याचे नियोजन केले आहे. त्यातील २५ बस डबल डेकर असतील. या बस पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकर प्रवाशांसाठी फायद्याच्या असणार की नाही, त्या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रवासीतज्ज्ञांशी दै.‌ 'पुढारी‌'च्या वतीने संवाद साधण्यात आला. त्या वेळी तज्ज्ञांनी ही मते मांडली.

PMPML Double Decker Bus
Pune Crime Rate: पुण्यात हिंसक गुन्ह्यांचा वाढता आलेख; सात महिन्यांत ५० खून, ८० जणांवर खुनी हल्ले

सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर म्हणाले की, या बसमुळे रस्त्यावरची कोंडी कमी होणार असून, प्रवाशांचीही दुप्पट वाहतूक होणार आहे. त्यामुळे या बस आणायला हरकत नाही. मात्र, त्या बसगाड्यांच्या संचलनाचे व्यवस्थापन व्यवस्थित व्हायला हवे. १०० टक्के भरूनच त्या धावल्या, तरच फायद्याच्या ठरतील; अन्यथा या बस आणून काही फायदा होणार नाही.

PMPML Double Decker Bus
Pune Ganesh Idol Making: कानात हेडफोन, हातात ब्रश अन् समोर बाप्पा; पुण्यातील मूर्तिकला केंद्रांत ‘जेन झी’चा नवा रंग

असे आहे डबल डेकर खरेदीचे नियोजन

शहरात एकूण २५ डबल डेकर बस टप्प्याटप्प्याने आणण्याचे नियोजन असून, या सर्व बस भाडेतत्त्वावर चालविल्या जाणार आहेत. यासंदर्भातील टेंडर प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. या कामासाठी एल-१ आणि एल-२ कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. ट्रॅव्हल टाईम्स आणि अँथनी या दोन ठेकेदारांची नियुक्ती या बस चालवण्यासाठी करण्यात आली आहे. डबल डेकर बसच्या पुनरागमनामुळे पुण्याच्या सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेला आधुनिक रूप मिळणार असून, प्रवाशांना एका वेगळ्या आणि आरामदायी प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.

कालांतराने डबल डेकर बस गायब होऊ नये

यापूर्वी एक डबल डेकर बस पुण्यात धावत होती. १११ नंबरची ही बस हडपसर ते पुणे महापालिकेदरम्यान धावत होती. मात्र, त्यानंतर ती गायब झाली, अशी स्थिती या येणाऱ्या डबल डेकर बाबत होऊ नये, अशी अपेक्षाही प्रवासीतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

PMPML Double Decker Bus
Pune Crime: वडापावसाठी गेला अन् जीव गमावला; पायाला धक्का लागल्याच्या वादातून पुण्यात तरुणाचा खून

व्होल्वो बसगाड्यांसारखी दुरवस्था नको

पीएमपी प्रवासी मंचचे अध्यक्ष जुगल राठी यांनी प्रशासनाच्या या निर्णयावर बोलताना भूतकाळातील अनुभवांकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, यापूर्वी पीएमपीएमएलने अतिशय उत्साहाने व्होल्वो बस ताफ्यात आणल्या होत्या. परंतु, अयोग्य नियोजन आणि देखभालीअभावी त्या काही दिवसांतच बंद पडल्या आणि प्रशासनासाठी पांढरा हत्ती ठरल्या. आता येणाऱ्या डबल डेकर बसबाबत असा प्रकार घडू नये, अशी आमची अपेक्षा आहे. तसेच, या बसच्या नियोजनासाठी स्वतंत्र जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. नियोजनात चूक झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करावी तसेच बस ज्या मार्गांवर धावणार आहेत, त्या मार्गांवरील झाडांच्या फांद्या, विजेच्या तारा व उड्डाणपुलांची योग्य पाहणी करून अपघाताची शक्यता शून्यावर आणावी, असेही राठी म्हणाले.

रस्त्यावरील जागा वाचेल; पण मार्गांची निवड महत्त्वाची

पीएमपी प्रवासी मंचचे मानद सचिव संजय शितोळे यांनी या निर्णयाचे स्वागत करतानाच काही महत्त्वाच्या मर्यादा स्पष्ट केल्या. डबल डेकर बस प्रवाशांसाठी अत्यंत सोयीच्या ठरतील. यामुळे रस्त्यावरील दोन बसची जागा एकच बस घेईल; म्हणजेच रस्त्यावरील ट्रॅफिक कमी होऊन एकाच वेळी दुप्पट प्रवाशांची वाहतूक शक्य होईल. परंतु, पुण्यातील काही रस्ते आणि पुलांची उंची लक्षात घेता, या बस चालवण्यावर मर्यादा येतील. त्यामुळे प्रशासनाने योग्य आणि अडथळा नसलेल्या मार्गांची अचूक निवड करूनच या बस रस्त्यावर उतरवाव्यात, असा सल्ला त्यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news