

बापू जाधव
निमोणे: शिरूर ग््राामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटात चालू निवडणुकीमध्ये एक वेगळाच फंडा पाहायला मिळतोय. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावोगावी बैठकांना जोर आल्याचे दिसून येते. या बैठकांत पक्ष कोणताही असो आपल्या गावच्या उमेदवाराला तिकीट मिळाले तर सर्व गावाने त्याच्या पाठीशी राहायचे असा निर्णय होत आहे. हा पॅटर्न या गटातील बहुतांशी गावांत यशस्वी होताना दिसत आहे.
हा जिल्हा परिषद मतदार संघ शिरूर-सातारा रस्ता ते घोड नदीचा काठ अशा पद्धतीने भौगोलिकदृष्ट्या पसरला आहे. यात शिरूर ग््राामीण पंचक्रोशी, करडे व न्हावरे हा शिरूर सातारा महामार्गावरील तर दुसऱ्या बाजूला तरडोबाची वाडी, गोलेगाव, चव्हाणवाडी, मोटेवाडी, निमोणे, गुणाट, शिंदोडी आदी गावांचा समावेश होतो.
दिवंगत माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांचे होम ग््रााउंड असणारी शिरूर पंचक्रोशी याच जिल्हा परिषद गटात येते. त्यामुळे मालतीताई बाबूराव पाचर्णे यांची उमेदवारी भारतीय जनता पार्टीकडून निश्चित मानली जात आहे. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतात की वेगवेगळ्या याबाबत ठोस निर्णय झालेला नसल्याने इच्छुकांतून अद्याप कोणी पुढे आले नाही.
जिल्हा परिषदेपेक्षा पंचायत समितीसाठी दोन्ही गणांमध्ये अनेक जण इच्छुक आहेत. जिल्हा परिषदेची उमेदवारी शिरूर पंचक्रोशीत बसली, तर नात्या-गोत्याचा मोठा भरणा असल्याने पंचायत समिती गणाची उमेदवारी ही पंचक्रोशीतच द्यावी लागते. त्यामुळे निमोणे, मोटेवाडी, चव्हाणवाडी, गोलेगाव ही शिरूर ग््राामीण पंचायत समिती गणातील गावे मुख्य पक्षाच्या उमेदवारीपासून वंचित राहतात. दुसऱ्या बाजूला लोकसंख्येने मोठे असणारे न्हावरे गावात जिल्हा परिषदेसाठी विशेष असे कोणीही इच्छुक नाही; मात्र येथून पंचायत समितीसाठी अनेकांची नावे पुढे येत आहेत.
सध्या न्हावरे गावात दोन्हीही बाजूकडून उमेदवारी दिली जाणार असे संकेत मिळत आहेत. न्हावरे पंचायत समिती गणामध्ये चिंचणी, गुणाट, शिंदोडी, आंबळे, करडे आदी गावे येतात. नात्या-गोत्याचा आणि आर्थिक बाजूचा विचार केला तर जिल्हा परिषदेची उमेदवारी ही करडे गावामध्ये बसू शकते. परंतु न्हावरे गणातील इतर गावे मुख्य पक्षाच्या उमेदवारीपासून वंचित राहू शकतात. त्यामुळे आपल्या गावासाठी एकत्रितपणे पुढे येऊन तिकीट मागू, असे म्हणत बहुतांश ठिकाणी गाव बैठका होत आहेत. आता यात किती गावांना यश मिळणार, लवकरच स्पष्ट होणार आहे.