

निमोणे: ‘दादांनी सांगितले आहे किंवा नको बाबा, दादांना कळालं तर’ या दोन वाक्यांभोवती शिरूरच्या राष्ट्रवादीचे सगळे राजकारण फिरत होते. अजितदादांचा दराराच एवढा मोठा होता, की त्यांच्यासमोर बोलण्याची कोणाचीच हिंमत होत नव्हती. स्थानिक पातळीवर कितीही एक-दुसऱ्याला पाण्यात पाहू; मात्र दादांनी दिलेला उमेदवार नाकारण्याची किंवा उघडउघड विरोधात जाण्याची कोणाही कार्यकर्त्यांमध्ये हिंमत नव्हती. परंतु, अजितदादांच्या दुर्दैवी निधनानंतर शिरूर तालुक्याच्या राजकारणामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली. दादांच्या धाकाने आजपर्यंत दोरीत चालणारे भविष्यात एक-दुसऱ्याचा मुलाहिजा ठेवतीलच, याबाबत सामान्य माणसांमध्ये साशंकता आहे.
राष्ट्रवादी काँग््रेासच्या जडणघडणीमध्ये ज्या स्थानिक नेतृत्वाने पक्षस्थापनेपासून महत्त्वाची भूमिका निभावली, ती मंडळी राष्ट्रवादी काँग््रेासच्या फुटीनंतर अडगळीत पडली. अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग््रेासच्या पालखीचे भोई होण्यात ज्यांनी ज्यांनी धन्यता मानली, त्यातील बहुतांश जणांचा थेट दादाशी संवाद असल्याने स्थानिक पातळीवर जरी एक-दुसऱ्याचे जमत नसले, तरी दादांसाठी आपल्याला संघटना वाढवायची, काम करायचे, यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही, ही भावना प्रबळ होती.
स्थानिक नेतृत्व जरी आपल्याला अडचणीत आणत असेल किंवा आपल्या कामाची कदर करीत नसेल, तरी अजितदादा आपल्याशी संवाद साधतात, ही एक जमेची बाजू होती. दादा एक शब्द जरी बोलले, तरी त्या कार्यकर्त्याला आसमान ठेंगणे होत होते. दादा मला ओळखतात, अडीअडचणीच्या काळात दादा पाठीशी उभे राहतील, हा विश्वास असल्याने कुणीच स्थानिक पातळीवर अंतर्गत मतभेदाला कवटाळून बसत नव्हते; मात्र आता परिस्थिती बदलली आहे. मन मोकळे करायची हक्काची जागा रिकामी झाल्याने पक्षांतर्गत मतभेद झाले, तर मन मोकळे करायचे कुणाकडे, हा प्रश्न भविष्यात ऐरणीवर येऊ शकतो.
सामूहिक शक्तीने एखादी निवडणूक जिंकली तरी नेतृत्व निवडताना आजपर्यंत दादांनी पाकिटात नाव पाठवून दिले, हा एक शब्द जरी पुढे आला, तरी कोणाची बोलण्याची टाप नव्हती. नव्या दमाच्या हेविवेट सुभेदारांना एकाच रेषेत उभे करण्याचे दिव्य आगामी काळात कशा पद्धतीने साध्य केले जाते, याबाबत सामान्य माणसाच्या मनात अनेक शंका-कुशंका चर्चिल्या जात असल्याचे वास्तव आहे.
तालुक्याच्या राजकारणावर मांड ठोकण्यासाठी आता प्रत्येकाचे प्रयत्न
राष्ट्रवादीच्या स्थानिक हेविवेट नेत्यांमध्ये जी काही मोजकी पाच-दहा नावे आहेत, ती मंडळी स्वतःच्या बालेकिल्ल्यात मातब्बर म्हणून ओळखली जातात. प्रत्येकाचे स्वप्न मोठे आहे. भविष्यात तालुक्याच्या राजकारणावर मांड ठोकण्यासाठी जो-तो आपल्या परीने ताकद लावून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार, हे सांगण्यासाठी आता कुणा ज्योतिष्याची गरज उरली नाही.