

प्रशांत मैड
शिक्रापूर : शिक्रापूर जिल्हा परिषद गट आगामी निवडणुकीमुळे पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीमुळे या गटात थेट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्यात प्रमुख लढत होण्याची चिन्हे आहेत. ही लढत माजी आमदार अशोक पवार व स्थानिक अजित पवार गटाचे नेते यांची कसोटी पाहणारी ठरणार आहे.(Latest Pune News)
या गटात अजित पवार गटासमोर उमेदवारी निश्चित करण्याचे मोठे आव्हान आहे. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य कुसुम मांढरे या पुन्हा एकदा दावेदार आहेत. माजी सभापती मोनिका हरगुडे यांनीही उमेदवारी मागितली आहे. मांढरे यांच्याकडे विद्यमान सदस्य म्हणून कामाचा अनुभव आहे, तसेच त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. कोविड काळात केलेले काम ही त्यांची जमेची बाजू आहे. आध्यत्मिक वारकरी संप्रदायांमध्ये त्यांचे मोठे काम आहे. त्यांचे पती व शिरूर बाजार समितीचे संचालक आबासाहेब मांढरे यांनी माजी आमदार अशोक पवार यांच्या विरोधात बंड पुकारून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खंबीर साथ दिली. यामुळे त्यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
सणसवाडी येथील मोनिका हरगुडे यांच्याकडे पंचायत समितीच्या सभापतीपदाचा प्रशासकीय अनुभव आहे. त्यांनी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ दिली आहे. एकाच गटातून दोन मातब्बर महिला नेत्यांची उमेदवारी मागितल्याने अजित पवार गटासमोर कोणाला उमेदवारी द्यायची असा प्रश्न पडला आहे.
तिरंगी लढत झाली तर भारतीय जनता पक्षाकडून अनपेक्षितरीत्या धक्कादायक चेहरा समोर येण्याची शक्यता आहे. भाजपा राष्ट्रवादीतील फुटीचा लाभ उठवण्यासाठी सज्ज असेल. जरी भाजप प्रमुख लढतीत नसला तरी, त्यांचे उमेदवार दोन्ही पवार गटाच्या मतांचे विभाजन करण्यास कारणीभूत ठरू शकतात. स्थानिक पातळीवर भाजपचा प्रभाव असलेले मतदार निर्णायक क्षणी कोणाला मदत करतात, यावरही या गटाचे चित्र अवलंबून आहे.
दुसरीकडे, शरद पवार गटातून माजी आमदार अशोक पवार कुठल्या उमेदवाराला संधी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या गटाकडून शिक्रापूरचे माजी सरपंच आबासाहेब करंजे यांच्या कुटुंबातील महिलेला किंवा माजी जिल्हा परिषद सदस्य रोहिणी बाबा सासवडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. शिक्रापूर जिल्हा परिषद गटातील लढत अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. अजित पवार गटाचे तिकीट वाटप हा येथील निवडणुकीचा सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरणार आहे.
शिक्रापूर गटात औद्योगिक आणि शेतीप्रधान मतदारांचे मिश्रण आहे. सणसवाडी, शिक्रापूर आणि कोरेगाव भीमा यांसारख्या औद्योगिक विभागातील मतदार विकास, रोजगार आणि स्थानिक नेतृत्वाच्या ठोस कामावर भर देण्याची शक्यता आहे. या मतदारांचा निर्णय अधिक निर्णायक ठरू शकतो. याउलट, कासारी गावासारख्या शेती प्रधान भागात शेतकरी मतदार आहेत. त्यांची भूमिका देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे.