

पुणे : कोंढवा येथील खडी मशिन चौकात भरदिवसा झालेल्या गोळीबारात रिक्षाचालक गणेश काळे याचा झालेला खून हा वनराज आंदेकरच्या खून प्रकरणाचा सूड म्हणून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. बंडू आंदेकर आणि त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर यांनीच यासाठी सूचना दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, तिघांसमवेत दोन अल्पवयीन मुलांना दुचाकीवर खेड-शिवापूर येथे पळून गेल्यानंतर सीसीटीव्हीचा मागोवा घेत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.(Latest Pune News)
अमन मेहबूब शेख (20, रा. काकडेवस्ती, कोंढवा), अरबाज अहमद पटेल (24, रा. काकडेवस्ती, कोंढवा) आणि मयूर दिगंबर वाघमारे (वय 23, रा. काकडेवस्ती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, दोन सतरा वर्षीय युवकांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचेसह कृष्णा आंदेकर (28), बंडू आंदेकर (69), स्वराज वाडेकर (25, तिघे रा. डोके तालीम चौक, नाना पेठ), अमीर खान (25) यांचेविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी, गणेश काळेचे वडील किसन धोंडिबा काळे (51, रा. शिवकृपा बिल्डिंग, येवलेवाडी, कोंढवा) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे.
या प्रकरणात शेख, पटेल आणि वाघमारे यांना अटक करत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. बी. यादव यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. अटक करण्यात आलेले आरोपी आंदेकर टोळीचे सदस्य आहेत. आरोपींनी वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी व त्यांच्या टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी आंदेकर यांच्या खुनामध्ये सहभाग असलेला व सध्या न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात असलेला आरोपी समीर काळेचा भाऊ गणेश काळे याच्यावर नजर ठेवून व पूर्वनियोजीत फौजदारीपात्र कट रचून सार्वजनिक ठिकाणी त्याचा खून केला आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. आरोपींनी खुनाच्या गुन्ह्याचा कट कुठे व कसा तयार केला? यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? यासह गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील प्रियांका वेंगुर्लेकर यांनी केला. त्यानंतर न्यायालयाने तीनही आरोपींना सहा नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. आरोपींच्या वतीने ॲड. प्रशांत पवार आणि ॲड. मिथुन चव्हाण यांनी बाजू मांडली.
गणेश काळे हा रिक्षाचालक असून, शनिवारी दुपारी तो खडी मशीन चौकात रिक्षा घेऊन थांबला होता. त्यावेळी पेट्रोल पंपाजवळ थांबलेल्या काळे याच्यावर अमन शेख, अरबाज पटेल आणि दोन अल्पवयीनांनी पिस्तुलातून गोळीबार करून डोक्यावर कोयत्याने वार केला. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे, तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार विशाल मेमाणे यांना मिळालेल्या माहितीवरून कोंढवा पोलिसांच्या पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक अफरोज पठाण यांच्या पथकाने रात्रीच सर्व आरोपींना खेड शिवापूर येथून अटक केली. तपास पोलिस निरीक्षक नवनाथ जगताप करत आहेत.
अमन शेख आणि अरबाज पटेल हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. अरबाजला काही वर्षांपूर्वी तडीपार करण्यात आले होते. 2024 मध्ये त्याच्यावर झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर तो अकोला कारागृहातून बाहेर पडला. दरम्यान, मार्च 2024 मध्ये तळेगाव दाभाडे येथे झालेल्या गोळीबारप्रकरणी अमन शेख आणि समर्थ तोरणे यांच्या ताब्यातून तीन पिस्तुले आणि चार काडतुसे जप्त करण्यात आली होती. गणेश काळे खून प्रकरणातील दोघा अल्पवयीनांवरही यापूर्वी गुन्हे नोंद आहेत.
गुन्ह्यात वापरण्यात आलेले पिस्तूल आरोपींनी कुठून आणले? खुनाच्या गुन्ह्याचा कट कोठे व कसा तयार केला? कटामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे ? अटक आरोपी व विधिसंघर्षग््रास्त बालक हे एकमेकांच्या संपर्कात कशा प्रकारे आले? गुन्हा करण्यासाठी आरोपींना आणखी कोणी व कसे सहकार्य केले आहे ? आरोपींचे मोबाईल फोन, ई-मेल याद्वारे त्यांना कुणी सुपारी दिली आहे का, याचा तपास करण्यासाठी सरकारी वकिलांनी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य करीत 6 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.