

शिक्रापूर: महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून दुचाकीवरून पसार होणाऱ्या सोनसाखळी चोरांच्या टोळीतील सराईत चोरट्याला अखेर शिक्रापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. १५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत, गोपनीय माहितीचे धागेदोरे जोडत पोलिसांनी आरोपीचा माग काढला. पोलिसांची चाहूल लागताच पळून जाणाऱ्या आरोपीचा तब्बल तीन ते साडेतीन किलोमीटर पाठलाग करून त्याला जेरबंद करण्यात आले.
प्रशांत ऊर्फ वरून घुमीर चव्हाण (वय २५, रा. चिंचोडी पाटील, ता. जि. अहिल्यानगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथे ३० जून रोजी सायंकाळी वैशाली विकास गव्हाणे या आपल्या मुलासह दुचाकीने घरी जात असताना विनानंबरच्या युनिकॉर्न मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी त्यांचा पाठलाग केला. अचानक दुचाकी आडवी करून आरोपींनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावले. त्यानंतर त्यांच्या दुचाकीला लाथ मारून त्यांना खाली पाडले आणि युनिकॉर्नवरून तिघेही पसार झाले. या प्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी गुन्हे शोध पथकाला आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. पोलिस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर आणि अंमलदार यांनी कोरेगाव भीमा ते अहिल्यानगरपर्यंतचा परिसर पिंजून काढत १५० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. प्रत्येक हालचालीचा बारकाईने अभ्यास करीत पोलिसांनी आरोपींचा माग काढला; मात्र आरोपी सराईत असल्याने पोलिसांना सातत्याने गुंगारा देत होता.
तो वारंवार राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने पोलिसांनी अहिल्यानगर जिल्ह्यात तळ ठोकला. गोपनीय बातमीदारांचे जाळे सक्रिय करण्यात आले. अखेर प्रशांत चव्हाण याचा ठावठिकाणा पोलिसांच्या हाती लागला. पोलिस पथक आरोपीच्या मागावर असतानाच त्याला पोलिसांची चाहूल लागली. त्याने तेथून धूम ठोकली; मात्र पोलिसांनीही हार न मानता त्याचा पाठलाग सुरू केला. तब्बल तीन ते चार किलोमीटरच्या थरारक पाठलागानंतर पोलिसांनी आरोपीला पकडून बेड्या ठोकल्या.
तपासात आरोपीने शिक्रापूर, डिंग्रजवाडी येथील गुन्ह्यासह शिरूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या आणखी एका सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीकडून तीन तोळ्यांचे दोन मंगळसूत्रे आणि गुन्ह्यात वापरलेली युनिकॉर्न मोटारसायकल असा एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वी मालमत्तेविरुद्धचे पाच गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. टोळीतील आणखी दोन पाहिजे आरोपींचा शोध सुरू असून, त्यांच्या अटकेनंतर या टोळीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.