पुणे : पुढारी वृत्तसेवा : गुंड शरद मोहोळ याचा गेम करण्यापूर्वी हाडशी गावातील दोन ठिकाणी आपल्या साथीदारांबरोबर गोळीबाराचा सराव केल्याने मुन्ना पोळेकरसह त्याच्या साथीदारांवर आता दोन आर्म अॅक्टचे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे दोन्ही गुन्हे बंडगार्डन पोलिस ठाण्यात दाखल होऊन पौड पोलिस ठाण्याकडे तपासासाठी शून्य नंबरने वर्ग करण्यात आले आहेत.सहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर (रा. सुतारदरा कोथरूड), नामदेव महिपती कानगुडे (34, रा. शिवशक्तीनगर, कोथरूड), सतीश संजय शेडगे (28, रा. स्वप्नशिल्प अपार्टमेंट, माथवाडी फाटा, भूगाव), आदित्य विजय गोळे (रा. गोळे आळी, पिरंगुट), नितीन अनंता खैरे (रा. नंदनवन सोसायटी, कोथरूड) अशी दोन वेगवेगळे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
शरद मोहोळचा खून करण्यासाठी कटात सहभागी होण्यासाठी मुन्ना पोळेकर याने अजय सुतार याच्यावर गोळीबार केला होता. त्यानंतर पौड पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तत्पूर्वी त्याने जुलै 2022 च्या शेवटच्या आठवड्यामध्ये मुळशी तालुक्यातील हाडशी गावातील बोडकेवाडी येथील कालेकर यांच्या शेतातील जांभळाच्या झाड्याच्या बुंध्यावर आरोपींनी गोळीबाराचा सराव केला होता. याप्रकरणी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसर्या गुन्ह्यात ऑक्टोबर 2022 च्या पहिल्या आठवड्यात मुळशी तालुक्यातील हाडशी गावातील सत्य साईबाबा ट्रस्टच्या मागील बाजूस असलेल्या गोविंद उभे यांच्या जागेत त्यांनी गोळीबराचा सराव केला होता. रात्री 1 एक वाजण्याच्या सुमारास येथे सुरू असलेल्या बांधकामासमोर असलेल्या एका झाडाच्या बुंध्यावर आरोपींनी गोळीबाराचा सराव केला असल्याचे तपासात आता समोर आले आहे. हा दुसरा गुन्हा देखील बंडगार्डन पोलिस ठाण्यात दाखल होऊन पौड पोलिस ठाण्याकडे तपासासाठी वर्ग केला आहे. एकीकडे गुन्ह्याची व्याप्ती वाढत असताना नवनवीन घडामोडी समोर येत आहेत.
हेही वाचा