Political News: मतदारसंघाच्या खेचाखेचीपासून उमेदवारीपर्यंतच्या रंगलेल्या स्पर्धेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून पर्वती मतदारसंघातून माजी स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम आणि खडकवासला मतदारसंघातून माजी नगरसेवक सचिन दोडके यांनी अक्षरश: उमेदवारी खेचून आणली.
महाविकास आघाडीत पर्वती मतदारसंघ राष्ट्रवादी पवार गटाकडे आहे. मात्र, माजी विरोधी पक्षनेते आबा बागूल यांच्यासाठी काँग्रेसने या मतदारसंघाची मागणी लावून धरली होती. मतदारसंघ काँग्रेसला सुटला नाही तर अगदी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्याची तयारी बागूल यांनी केली होती. त्यामुळे पवारांना साथ देणार्या कदम यांची धाकधूक वाढली होती. मात्र, पक्षाने मतदारसंघही स्वत:कडे कायम ठेवून कदम यांना न्याय दिला.
खडकवासला मतदारसंघातही राष्ट्रवादी पवार गटात इच्छुकांची मोठी स्पर्धा होती. दोडके यांच्यासह काका चव्हाण, बाळा धनकवडे, नवनाथ पारगे, अनिता इंगळे अशी मोठी इच्छुकांची संख्या होती. त्यामुळे कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत उत्सुकता होती. गत विधानसभा निवडणुकीत थोडक्यात पराभव झालेल्या आणि राष्ट्रवादीत फुटीनंतर पक्षाबरोबर ठाम राहून लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळेंना साथ देणार्या दोडके यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले आहे.
आबा बागूल यांच्या भूमिकेकडे लक्ष
मतदारसंघ आणि उमेदवारीसाठी आग्रही असलेल्या आबा बागूल यांना दोन्ही संधी मिळालेल्या नाहीत. ‘निष्ठेची हत्या झाली’, अशी प्रतिक्रिया देत त्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, ते आता निवडणूक लढविण्याच्या भूमिकेवर ठाम राहणार का? याबाबत उत्सुकता लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्यावर जो विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली, त्याबद्दल मी आभारी आहे. ही निवडणूक म्हणजे सत्य-असत्याची लढाई आहे. त्यात निश्चितपणे सत्याचा विजय होईल.
- सचिन दोडके, उमेदवार, खडकवासला.
मतदारसंघातील सर्व नागरिकांना आणि घटक पक्षांना बरोबर घेऊन निवडणूक लढविणार. पर्वती मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवून कायापालट करण्यासाठी विजय मिळविणार आहे.
- अश्विनी कदम, उमेदवार, पर्वती.