Pune Politics: शहरातील आठपैकी सर्वांत जास्त सहा जागा भाजप लढविणार असून, त्यापाठोपाठ चार जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे आहेत. तर काँग्रेसकडे तीन आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी दोन जागा आहेत. मात्र, शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर अवघी एक जागा आली असून, शिंदेच्या शिवसेनेला मात्र एकही जागा मिळू शकलेली नाही. सद्य:स्थितीला असलेल्या जागा टिकविण्याचे आव्हान भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीपुढे आहे.
विधानसभा निवडणुकीत पुण्यात आठही जागांवरील निवडणुकीचा सामना प्रामुख्याने महायुती विरुध्द महाविकास आघाडी असाच रंगणार आहे. सद्य:स्थितीला आठपैकी सात जागा महायुतीकडे आहेत. त्यात भाजप सहा, तर राष्ट्रवादी दोन आणि महाविकास आघाडीत एक जागा काँग्रेसकडे आहे. आता निवडणुकीला सामोरे जाताना महायुतीमध्ये भाजपकडे कसबा पेठ, कोथरूड, पर्वती, पुणे कॅन्टोंमेन्ट, शिवाजीनगर आणि खडकवासला या पाच जागा आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे वडगाव शेरी व हडपसर या दोन जागा मिळाल्या आहेत.
शिवसेना शिंदे गटाने हडपसरच्या जागेवर दावा केला होता. मात्र, ही जागा राष्ट्रवादीकडेच कायम राहिल्याने शिवसेनेच्या वाट्याला पुण्यात एकही जागा आलेली नाही. तर महाविकास आघाडीत पर्वती, खडकवासला, हडपसर आणि वडगाव शेरी या जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडे आहेत.
तर शिवाजीनगर, पुणे कॅन्टोंमेन्ट आणि कसबा पेठ या तीन जागा काँग्रेसकडे, तर कोथरूडची एक जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळाली आहे. मनसेने हडपसर, कोथरूड, कसबा पेठ आणि खडकवासला या जागेवर उमेदवार उभे करून युती आणि आघाडीला आव्हान उभे केले आहे. तर वंचित आणि तिसरी आघाडीने काही जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे.