वाघोलीत नगर रोडवर सांडपाण्याचा त्रास; वाहनचालक, नागरिकांची कसरत

वाघोलीत नगर रोडवर सांडपाण्याचा त्रास; वाहनचालक, नागरिकांची कसरत

वाघोली : पुढारी वृत्तसेवा : पुणे-नगर महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून ड्रेनेज लाईनचे दुर्गंधीयुक्त पाणी वाहत आहे. त्यामूळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच वाहनचालक व पादचार्‍यांना ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. या विरोधात मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. रस्त्यावरून वाहणार्‍या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. महामार्गावरून वेगाने जाणार्‍या वाहनामुळे हे पाणी नागरिकांच्या अंगावर उडत आहे. या ठिकाणी होणार्‍या वाहतूक कोंडीत या पाण्यामुळे आणखी भर पडत आहे.

याबाबत नागरिकांनी महापालिकेच्या अधिकार्‍यांकडे तक्रारी केल्या आहेत. परंतू, प्रशासनाने अद्यापही उपाययोजना केल्या नाहीत. गटाराचे पाणी रस्त्यावर कोण सोडते याचा अद्यापही शोध लागत नसल्याचे उत्तर संबंधित अधिकार्‍यांकडून देण्यात येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. या समस्ये विरोधात मनसेचे प्रकाश जमधडे यांच्या वतीने नगर रोडवर आंदोलन करण्यात आले. या वेळी मनसे कार्यकर्ते, विद्यार्थी व नागरिक उपास्थित होते. परिसरातील नागरिकांकडून प्रशासन कर वसूल करीत आहे. मात्र, मूलभूत सुविधा देण्याबाबत महापालिका उदासीन का? असा प्रश्न नागरिक उपस्थितीत करीत आहेत. याबाबत कनिष्ठ अभियंता रुपाली वाळके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

महापालिका प्रशासन केवळ कर संकलनासाठी?

पुणे-नगर महामार्गावरील दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव देखील वाढला आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिका प्रशासनाने ही समस्या सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे आहे. महापालिकेचे या भागातील विविध समस्यांकडे दुर्लक्ष होत असून, प्रशासन केवळ कर गोळा करण्यासाठी आहे का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news