वाल्हे : पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यांसह राज्यात अनेक तालुक्यात यावर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने तीव्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरीवर्गाच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी वाल्हे येथे पुरंदर आपचे बेमुदत साखळी उपोषण मागील आठवड्यापासून सुरू करण्यात आले आहे. मात्र, शासनाकडून याबाबत कोणतेही दखल न घेतल्याने, दुष्काळी परिस्थितीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (दि. 6) वाल्हे (ता. पुरंदर) येथे पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर जनावरांसह रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
संपूर्ण राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, राज्य सरकारने जाहीर केलेल्या यादीत पुरंदर तालुक्याचा समावेश आहे. मात्र, शासनाकडून तीन महिने आधी यासंदर्भात अध्यादेश काढूनही, दुष्काळी परिस्थितीबाबत अद्यापपर्यंत कसलीच उपाययोजना करण्यात आली नाही. तालुक्यातील अनेक गावात चारा व पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने शेतकर्यांना पशुधन सांभाळणे जिकरीचे झाले आहे. सरकारने दुष्काळाच्या गंभीर समस्येकडे लक्ष देत त्वरीत चारा डेपो सुरू करावेत; तसेच पीक कर्जावरील व्याज माफ करावे; विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करून त्यांना एसटी पास मोफत देण्यात यावे; शेती पंपाचे पूर्ण वीज बिल माफ करावे; दुष्काळ संदर्भात अध्यादेश निघाल्यानंतर 21 दिवसांपर्यंत तो लागू व्हावा, असा कायदा सरकारने करावा आदी मागण्यांसाठी आम आदमी पार्टी पुरंदरने शेतकर्यांसोबत हे आंदोलन सुरू केले असल्याचे आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय कड यांनी सांगितले.
आप जिल्हाध्यक्ष अमोल देवकाते, तालुकाध्यक्ष दत्तात्रय कड, राजन पवार, माणिक पवार, संपत भुजबळ, संजय जगताप, महेश जेधे, शहाजी कोलते, संदीप चौडकर, सचिन गायकवाड, राजेंद्र गायकवाड, श्रीकांत लक्ष्मी शंकर, अतिश जगताप, पांडुरंग बनकर आदींसह परिसरातील शेतकरीवर्ग उपस्थित होते.
दरम्यान, रास्ता रोको आंदोलन थांबण्यात यावे, यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्न करीत असताना काही आंदोलक पालखी महामार्गावर झोपल्याने पोलिस प्रशासन व आंदोलक यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र ज्येष्ठ आंदोलकांच्या मध्यस्थीने आंदोलन शांततेत पार पडले. यावेळी जेजुरीचे पोलिस उपनिरीक्षक कुंडलिक गावडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक केशव जगताप, पोलिस हवालदार विनायक हाके, भाऊसाहेब भोंगळे, पोलिस नाईक प्रशांत पवार आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.