

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 15 जून 2025 ला सेट परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला येत्या 15 ऑगस्टला तब्बल दोन महिने पूर्ण होणार आहेत. तरीही संबंधित परीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे सेट परीक्षेच्या निकालाचा नेमका मुहूर्त कोणता, असा प्रश्न आता सेट परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी उपस्थित केला आहे.
विद्यापीठातील सेट परीक्षा विभाग हा महाराष्ट्र शासनाची नोडल एजन्सी तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यापीठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदाची पात्रता परीक्षा घेण्याकरिता प्राधिकृत विभाग आहे. (Latest Pune News)
महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक सेट आणि नेट परीक्षेचे जून महिन्यात आयोजन करण्यात आले होते. त्यातील नेट परीक्षेचा निकालदेखील जाहीर करण्यात आला आहे. परंतु सेट परीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे सेट परीक्षेच्या निकालाला उशीर होण्याचे नेमके कारण काय, अशी विचारणा सेट परीक्षा दिलेले उमेदवार करत आहेत.
विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागामार्फत महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांकरिता मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, परभणी, नंदुरबार आणि गोवा अशा एकूण 18 शहरांमधील 256 महाविद्यालयातील 4 हजार 609 वर्ग खोल्यांमध्ये पारंपरिक पद्धतीने सेट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
परीक्षेसाठी 1 लाख 10 हजार 412 विद्यार्थ्यांनी कला, विज्ञान, वाणिज्य, सामाजिक शास्त्र, विधी, व्यवस्थापन शिक्षण आणि शारीरिक शिक्षण अशा विविध शाखांमधील 32 विषयांसाठी अर्ज भरले होते. त्यापैकी 90 हजार 446 म्हणजेच 82 टक्के विद्यार्थी परीक्षेत उपस्थित होते. त्यामुळे संबंधित उमेदवारांना आता निकालाची प्रतीक्षा आहे.