Pune city traffic jam
पुणे: रस्त्यांची झालेली चाळण, पाऊस आणि मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहने घेऊन नागरिक बाहेर पडल्याने शनिवारी सलग दुसर्या दिवशी शहरात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. तसेच, शहरालगत असणार्या सर्व महामार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. त्यामुळे प्रवाशांना तासन् तास वाहनात बसून राहावे लागले.
शनिवारी सकाळपासूनच शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मध्यवर्ती भागातील शिवाजीनगर, जंगली महाराज रस्ता, गोपाळकृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन रस्ता), लक्ष्मी रस्ता आणि कुमठेकर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. केवळ शहरच नाही, तर उपनगरे आणि शहराला जोडणार्या सर्व प्रमुख महामार्गावरही याच कोंडीचा अनुभव आला. मुंबई- पुणे महामार्ग, पुणे- सातारा रस्ता, हडपसर-सोलापूर रस्ता आणि नगर- पुणे रस्त्यांवर रात्री उशिरापर्यंत वाहने अडकून पडली होती. (Latest Pune News)
राखी पौर्णिमा आणि पाऊस असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहने आलेले दिसून येत होते. लहान रस्ता आणि त्यांनतर मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणातवर वाहने उतरली होती. यामुळे शहर आणि परिसरात सकाळपासूनच शहरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
त्यात दुपारी जोराचा पाऊस आल्याने भर पडली. विशेषतः संध्याकाळी चार नंतर ही कोंडी अधिकच तीव्र झाली. अनेक चौकांमध्ये सिग्नलवर गाड्यांची मोठ्या रांगा लागल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली होती.
शहरात विविध विकासकामे, उड्डाणपुल आणि मेट्रोचे कामकाज सुरू असल्याने अनेक रस्ते लहान झाले आहेत. तसेच या कामामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी खरेदीसाठी आलेल्या वाहनचालक अनधिकृत वाहने रस्त्यांतच लावल्याने कोंडीत भर पडली होती.
वाहतूक पोलिस अन् वॉर्डन गायब
शहर आणि परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली असताना त्याला नियंत्रित करण्यासाठी असणारे वाहतूक पोलिस आणि वॉर्डन गायब असल्याचे चित्र सलग दुसर्या दिवशीही पाहायला मिळाले. तसेच काही ठिकाणी सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने चौकाचौकांत वाहने अडकून पडली होती.