Servants of India : डॉ. अजित रानडेंकडून नॅक कमिटीची दिशाभूल

Servants of India : डॉ. अजित रानडेंकडून नॅक कमिटीची दिशाभूल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गोखले इन्स्टिट्यूटचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांनी विद्यापीठाचे मूल्यांकन करणार्‍या नॅक (नॅशनल असेसमेंट अँड अ‍ॅक्रिडेशन कौन्सिल) कमिटीचीदेखील दिशाभूल केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटी ही गोखले इन्स्टिट्यूटची जननी संस्था आहे. मात्र, डॉ. अजित रानडे हे गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरुपदी बेकायदेशीरपणे जाऊन बसले. तेव्हापासून सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटी या संस्थेला विभक्त करून गोखले संस्था फस्त करण्याचेच प्रयत्न सुरू आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये डॉ. रानडे यांच्या बेकायदेशीर निवडीनंतर संस्थेचे सचिव मिलिंद देशमुख यांनी हातमिळवणी करून स्वतःच्या मुलाला संस्थेत आजीवन सदस्य करण्यासाठी संस्थेच्या मालमत्तेचे व्यावसायिकीकरण केले.

माहिती अधिकारातील कागदपत्रांनी रानडेंचे बिंग फोडले

सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीच्या आठ एकर जमिनीबाबत नॅक कमिटीचीसुद्धा दिशाभूल करून देशमुखांनी गोखले इन्स्टिट्यूटकडून आर्थिक लाभ उकळण्यासाठी गैरप्रकार केले. याबाबत काही विचारणा करणार्‍या प्राध्यापकांना बाहेर काढल्यानंतर थेट विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत कुलपती डॉ. राजीव कुमार यांचा वरदहस्त वापरत कुलगुरुपदी रानडे यांना बसविण्यासाठी व्यवस्थापन मंडळाकडून देशमुख यांनी जोरदार फिल्डिंग लावली. डॉ. रानडे हे विद्यापीठ अनुदान आयोगाने कुलगुरुपदासाठी निश्चित केलेल्या नियमानुसार कुलगुरुपदासाठी पात्रच नाहीत. याबाबत माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रसिद्ध झालेल्या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे.

रानडे-देशमुख यांच्यामुळेच संस्था बदनाम

या प्रकाराने हादरलेले डॉ. रानडे हे दिल्ली दौरा करून आले. मात्र, जानेवारी 2024 रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाने गोखले इन्स्टिट्यूटला नोटीस काढून याबाबत माहिती मागितली. डॉ. रानडे यांच्या वर्तनामुळे सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीकडे बघण्याचा दृष्टिकोनच पार बदलून गेला आहे. यासाठी संस्थेचे अध्यक्ष दामोदर साहू हे जबाबदार असल्याचे संस्थेच्या परिसरात बोलले जात आहे. कारण, गोखले इन्स्टिट्यूटचा हेतू हा शैक्षणिक व सामजिक आहे. मात्र, डॉ. रानडे यांनी व्यावसायिक हेतू ठेवून सर्व मालमत्तेची विल्हेवाट लावण्यासाठी बड्या व्यावसायिकांना व्यवस्थापन मंडळात सामील केले.

बिल्डरांना दिल्या जाताहेत संस्थेच्या जमिनी

कोट्यवधी रुपयांचा निधी, देणगी जमा केली जात आहे. विद्यार्थ्यांकडून अवाच्या सव्वा फी आकारणी करीत आहेत. बिल्डरांना संस्थेच्या जमिनी देण्यासाठी करार करून जास्तीत जास्त पैसा स्वतःकडे खेचत आहेत. अधिकाराचा गैरवापर त्यांनी खुलेआम सुरू केला आहे. यासाठी संस्थेच्या विश्वस्तांना दूर करण्यासाठी देशमुख व डॉ. रानडे मिळून अध्यक्षाला पत्र लिहून भेद निर्माण केल्याचेसुद्धा प्रकार बाहेर आले आहेत. या वर्षी इन्स्टिट्यूटचा वार्षिक अर्थसंकल्पसुद्धा तयार करण्यासाठी सनदी लेखपालही तयार नाहीत. इतका मोठा आर्थिक घोळ संस्थेत आहे.

शैक्षणिक खर्चापेक्षा स्वतःच्या सुखसोई तसेच बेकायदेशीर केलेल्या कारवाया दडपण्यासाठी देशमुख व डॉ. रानडे खर्च करतात, हे दाखविणे अर्थसंकल्पात अडचणीचे झाले आहे. नामदार गोखले यांनी नैतिकतेच्या आधारावर उभारलेली सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटी स्वतः कुलगुरूच फस्त करीत आहेत. मात्र, त्यांचा डाव हाणून पाडण्यासाठी मला न्यायव्यवस्था आणि सामाजिक लोकांचे सहकार्य मिळत आहे.

– प्रवीणकुमार राऊत, हरकतदार

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news