Mumbai News : मुंबई पोलिसांच्या सतर्कतेने तिघे अटकेत

Mumbai News : मुंबई पोलिसांच्या सतर्कतेने तिघे अटकेत
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : सागरी सुरक्षा भेदून मुंबईच्या किनारी बोटीसह दाखल झालेले ते तिघे तामीळनाडूचे वेठबिगारी आणि मालकाच्या तावडीतून निसटून पळून आलेले कामगार निघाले; अन्यथा आज मुंबईत 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याची पुनरावृत्ती झाली असती. कुवैतहून निघालेली ही बोट मंंगळवारी बिनदिक्कत मुंबईच्या हद्दीत शिरली. ना ती नौदलाने पाहिली ना ती तटरक्षक दलाला दिसली. अत्यंत सतर्क असलेल्या कुलाबा पोलिसांना मात्र शंका आली आणि त्यांनी मग झोपलेल्या नौदलास व तटरक्षक दलास सतर्क करतानाच या बोटीवरून आलेल्या तिघांना ताब्यात घेतले. (Mumbai News)

विजय विनोद अ‍ॅन्थोनी (32), नित्सो डिट्टो (31) आणि सय्यंथा अनिश (32) असे हे तिघे तमिळनाडूचे रहिवासी आहेत. हातावर पोट भरणारे हे कामगार कुवैतला गेले आणि मालकाचे गुलाम बनले. रात्रंदिवस मालक काम करून घ्यायचा आणि पैसे मात्र द्यायचा नाही. खाण्या-पिण्याचेही वांदे. अशा अवस्थेत दोन वर्षे काढली आणि मग मालकाचीच बोट घेऊन निसटण्याचा निर्णय त्यांनी घेतला. बोटीवर बसवलेल्या जीपीएसच्या मदतीने त्यांनी दहा दिवसांत मुंबई गाठली. (Mumbai News)

इथंपर्यंत कामगारांच्या सुटकेची ही कहाणी साधी सरळ वाटत असली तरी मुंबईवर पुन्हा 26/11 ची वेळ येऊ शकते, याची अटळ शक्यताच या कहाणीने उघड केली.

या तिघा कामगारांच्या बोटीने मुंबईची सागरी हद्द ओलांडली तरी त्यांना कुणी अडवले नाही. हटकले नाही. ते सरळ मुंबईच्या किनारी धडकले. नौदल आणि तटरक्षक दलापेक्षा सतर्क होते ते मुंबई पोलिस. येलो गेट पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सुधीरकुमार, सहायक उपनिरीक्षक केकर, खलाशी शिपाई अभिजित अविनाश थोरात हे 'चैत्राली' या पोलिस नौकेवर गस्त घालत असताना, त्यांना ससून डॉकसमोरील शंखरॉक किनार्‍यावर वेगळ्या आकाराची आणि संशयित बोट दिसली. त्यांनी बोटीवरील तिघांची चौकशी केली. त्यांना मराठी आणि हिंदी बोलता येत नव्हते. दक्षिण नियंत्रण कक्षाला सतर्क करून त्यांनी तिघांना पोलिस ठाण्यात आणले.

तिघेही कन्याकुमारीचे रहिवासी

विजय विनोद अ‍ॅन्थोनी, नित्सो डिट्टो आणि सय्यंथा अनिशहे तिघेही कन्याकुमारीचे रहिवासी आहेत. त्यांच्याकडे व्हिसा आणि पासपोर्ट नव्हते. ही बोट कुवेतचे अब्दुल्लाह शराहित यांच्या मालकीची असून, याच बोटीवर ते कामाला होते. या तिघांनी आंतरराष्ट्रीय सीमा उल्लघंन करून कुवेतची बोट भारतात प्रवेश करताना कुठलीही परवानगी घेतली नव्हती. कुवेत-भारत दरम्यानचा संपूर्ण प्रवास त्यांनी कोणत्याही परवान्याशिवाय केला. कुठेही त्यांना अडवले गेले नाही. पण ज्या मुंबईत कसाबसह पाकिस्तानची अतिरेकी टोळी अशीच एक बोट घेऊन कराचीहून मुंबईत धडकली आणि 26/11 चा हाहाकार उडवला. त्या मुंबईच्या सागरी हद्दीत तरी ही बोट अडवली जाणे अपेक्षित होते. नौदलाने किंवा तटरक्षक दलाची गस्त सुरू असताना ही बोट मुंबईच्या सागरी हद्दीत शिरली आणि मुंबईच्या किनारपट्टीला लागल्यावर ती मुंबई पोलिसांना दिसली. हे तिघे बोटीवरून उतरून पसार होण्यापूर्वी हाती लागले. याचा अर्थ आजही अशी सागरी हद्द भेदून मुंबईत धडकता येते हे स्पष्ट झाले.

नौदल आणि तटरक्षकचे चमत्कारिक उत्तर

30 मीटर लांबीची ही कुवैती बोट बिनदिक्कत मुंबई किनारी धडकणे म्हणजे मुंबईच्या सुरक्षेत झालेली मोठी गडबड समजली जाते. या गडबडीला जबाबदार कोण? मुंबईच्या समुद्रावर विमान, हेलिकॉप्टर आणि बोटींमधून सतत गस्त घालणारे नौदल आणि तटरक्षक दल यांच्याकडे असलेले उत्तर चमत्कारिक आहे. दीपस्तंभाजवळ आम्ही ही बोट थांबवली आणि आम्हीच पोलिसांना सतर्क केले, असा नौदल सूत्रांचा दावा आहे. (Mumbai News)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news