

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पाच दशके अविरतपणे रंगभूमीची सेवा करणारे, रंगभूषाकार नव्हे, तर 'रंगभाषाकार' हे बिरूद सार्थ करणारे ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर नीलकंठ भावे ऊर्फ भावेकाका (वय 78) यांचे मंगळवारी राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. महाविद्यालयीन तरुणांमध्ये ते भावेकाका नावाने ओळखले जात. भावे यांची रंगभूषाकार म्हणून सुमारे 55 वर्षांची कारकीर्द होती. नाटकामध्ये रंगभूषेला स्वतंत्र अस्तित्व मिळवून देण्यात भावे यांची भूमिका मोलाची ठरली. ते 'रंगभूषाकार' नाही, तर 'रंगभाषाकार' ठरले.
मूळचे सातारा येथील असलेल्या भावे यांना कुटुंबातूनच कलेचा वारसा लाभला. पुढे भावे यांना रंगभूषेविषयी उत्सुकता वाटू लागली, त्यांचे या कलेवर प्रेम जडले आणि त्यांनी रंगभूषा हेच आपले कार्यक्षेत्र ठरवले. 1968 च्या सुमाराला ते पुण्यात नोकरीनिमित्त आले. त्यावेळी पुण्यात नाट्यविश्वात कार्यरत असलेले राजाभाऊ नातू आणि भालबा केळकर यांच्याशी त्यांची भेट झाली आणि पुण्याच्या नाट्यविश्वाला हक्काचा रंगभूषाकार मिळाला. केवळ रंगभूषाच नाही, तर विविध मुखवटे, विगही ते तयार करायचे. त्यांनी केलेल्या मुखवट्यांची आतापर्यंत सुमारे 16 प्रदर्शने देशभरात झाली.
डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यापासून ते आताच्या सिद्धार्थ चांदेकरपर्यंतच्या अभिनेत्यांच्या पिढ्या भावेकाकांच्या रंगभूषेतून घडल्या आहेत. सुमारे दीड हजार नाटकांची रंगभूषा त्यांनी केली आहे. महाराष्ट्रातील सर्व नावाजलेल्या नाट्य स्पर्धांशी ते रंगभूषाकार म्हणून संबंधित होते.
अनेक वर्षे पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत सहभागी होणार्या स्पर्धकांची रंगभूषा भावे नियमितपणे करत असत. फिरोदिया करंडक स्पर्धेतील स्पर्धकांची रंगभूषा करण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी 'रंगभूषा' नावाचे पुस्तक लिहिले. या पुस्तकाला राज्य सरकारचा उत्तम साहित्यकृतीचा पुरस्कार मिळाला होता. त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.