

गणेश खळदकर
पुणे : राज्याभरात प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये लाखो विद्यार्थी शिकत आहेत. मात्र त्यांच्या सुरक्षेबाबत शाळा गंभीर नसल्याने विद्यार्थी सुरक्षेबाबतच्या उपाययोजना केवळ कागदावर राहिल्या आहेत. त्यामुळेच उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करत प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला सुरक्षेसंदर्भातील माहिती देण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा आता शाळांना गांभीर्याने घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.(Latest Pune News)
उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रतापसिंह यांनी प्राथमिक तसेच माध्यमिकच्या संचालकांना यासंदर्भात निर्देश दिले आहेत. त्यानुसार, सर्व शाळांनी (शासकीय, खासगी, आश्रमशाळा, अंगणवाडी, बालगृहे) विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंबंधी उपाययोजनांची माहिती प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला अद्ययावत करणे गरजेचे आहे. शाळांनी शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर नोंद केलेल्या माहितीबाबत शाळेच्या दर्शनी भागामध्ये पोर्टलची माहिती दर्शविणारा फलक लावून पालकांच्या निर्दशनास आणून द्यावा. जेणेकरून संकेतस्थळास भेट देऊन पालकांना शाळेच्या विद्यार्थी सुरक्षेच्या अंमलबजावणीची स्थिती जाणून घेता येईल.
सर्व शाळांनी विद्यार्थी सुरक्षिततेच्या संदर्भात शासन निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत सुधारित माहिती स्कूल पोर्टलवर अद्ययावत करावी. त्यानुसार मासिक बैठकांची संक्षिप्त माहिती व इतर सुधारणा प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत अद्ययावत करण्यासंदर्भात शाळांना सूचना देणे गरजेचे आहे. तसेच, विद्यार्थी सुरक्षिततेच्या उपाययोजनांची तपासणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना आस्कमिक भेट देण्याचेही न्यायालयाचे निर्देश आहेत. शाळांकडून या उपाययोजना करण्यामध्ये प्रशासनाला कुठेही शिथिलता आढळल्यास संबंधित शाळा, व्यवस्थापनांकडून सत्वर अंमलबजावणी करून घेण्यात यावी. सर्व पर्यवेक्षीय अधिकारी यांनी भेट दिलेल्या शाळांचा संकलीत अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करावा. उच्च न्यायालयाच्या निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून त्याबाबतच्या नियमांसदर्भातील अनुपालन अहवाल 15 दिवसांत सादर करावा असे देखील आयुक्त सिंह यांनी स्पष्ट केले आहे.
विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात तब्बल 60 निकष ठेवण्यात आले आहेत. त्याचा संबंधित शाळांकडून आढावा घेण्यात येत आहे. राज्यातील 1 लाख 8 हजार शाळांपैकी जवळपास 96 ते 99 हजार शाळांनी माहिती भरलेली आहे. उर्वरित शाळांनाही विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात वारंवार सूचना दिलेल्या आहेत. सर्वच शाळांकडून विद्यार्थी सुरक्षेबाबतच्या 60 निकषांची पूर्तता करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
शरद गोसावी, संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय
राज्यात सध्या माध्यमिकच्या 30 हजार 86 तर प्राथमिकच्या 78 हजार 120 शाळा आहेत. त्यापैकी माध्यमिकच्या 25 हजार 561 शाळांनी माहिती भरली असून, 4 हजार 525 शाळांनी माहिती भरलेली नाही. तसेच प्राथमिकच्या 71 हजार 494 शाळांनी माहिती भरली असून, 6 हजार 626 शाळांनी माहिती भरलेली नाही. त्यामुळे प्राथमिक आणि माध्यमिकच्या 11 हजार 151 शाळांनी अद्यापही माहिती भरली नसल्याचे उघडकीस आले आहे.