पुणे : वीजवाहिनीचा धक्का बसून शाळकरी मुलाचा मृत्यू

पुणे : वीजवाहिनीचा धक्का बसून शाळकरी मुलाचा मृत्यू

पुणे/कात्रज; पुढारी वृत्तसेवा: कात्रज कोंढवा बाह्यवळण रस्त्यावरील सोसायटीत उच्च दाब वीजवाहिनीचा धक्का लागून गंभीर जखमी झालेल्या शाळकरी मुलाचा रविवारी ( दि. 30) सकाळी मृत्यू झाला. हृषीकेश मंजुनाथ पुजारी (14, रा. कर्वेनगर) असे या मुलाचे नाव आहे. राजीव गांधी पंपिंग स्टेशन ते गोकुळनगरकडे जाणारी 22 केव्ही उच्च दाब वाहिनी खासगी सोसायटीच्या सीमा भिंतीनंतर गार्डनमध्ये अनेक दिवसांपासून लोंबकळत आहे. त्याकडे महावितरणचे दुर्लक्ष झाल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. तसेच, यासंदर्भात जबाबदार व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

कर्वेनगरला राहणारे मंजुनाथ पुजारी हे सिंहगड रोड परिसरातील एका दुकानात फर्निचरचे काम करतात. 23 आकटोबरला कामानिमित्त ते कात्रजला आले होते. शाळेला सुटी असल्याने त्यांचा इयत्ता नववीमध्ये शिकणारा मुलगा हृषीकेशही त्यांच्यासोबत आला होता.
पुजारी काम करीत असताना तो बाहेर खेळत होता. तेथे लोंबकळणार्‍या उच्च वीजवाहिनीचा धक्का बसल्याने तो गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले होते. तेथे उपचारादरम्यान रविवारी तो मरण पावला. भारती विद्यापीठ पोलिसांकडे यासंदर्भात नोंद करण्यात आली आहे.

महावितरणच्या गलथान कारभारामुळे माझ्या अपंगाचा एकुलता एक आधार गमावला आहे. मुलाच्या उपचारासाठी मदत मिळाली नाही. आर्थिक भरपाई मिळावी, मात्र जे कोणी दोषी महावितरणचे अधिकारी आहेत, त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी.

                                                               -मंजुनाथ पुजारी, मुलाचे वडील

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news