Pimpri News : अर्धे वर्ष संपले; तरीही मिळेना स्कॉलरशीपची पुस्तके

Pimpri News : अर्धे वर्ष संपले; तरीही मिळेना स्कॉलरशीपची पुस्तके

Published on

पिंपरी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी महिन्यात होत असते. दरवर्षी मनपा शाळेतील पाच ते सहा हजार विद्यार्थी परीक्षेला बसतात. मात्र, पुस्तकांच्या खरेदीसाठी शिक्षण विभागाकडून उशीर होत असल्याने अर्धे शैक्षणिक वर्ष संपले तरी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके पडली नाहीत.

विद्यार्थी, पालक चिंतेत

स्कॉलरशीपची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांची भविष्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी असते. या परीक्षांमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावे ही पालक आणि शिक्षकांचीदेखील इच्छा असते. मात्र, या परीक्षेच्या तयारीसाठी लागणार्‍या पुस्तकांच्या खरेदीसाठी शिक्षण विभागाकडून उशीर केला जात आहे. त्यामुळे पुस्तके मिळणार कधी आणि मुले अभ्यास करणार कधी असा प्रश्न पालक विचारत आहेत.

पुस्तकांचे दर वाढविल्याने उशीर

शिक्षण विभागाकडून दरवर्षी पुस्तके बालभारतीकडून मागविली जात होती. यंदा बालभारतीने पुस्तकांचे दर वाढविले आहेत. त्यामुळे पुस्तकांचे टेंडर बालभारतीला द्यायचे की खासगी पुस्तक प्रकाशन संस्थेला द्यायचे या विवंचनेत निविदा पाठविण्यास उशीर झाला असल्याचे बोलले जात आहे.

जुन्या पुस्तकांवर शिकविला जातो अभ्यास

स्कॉलरशीपची पुस्तके परीक्षेच्या तोंडावर मिळत असल्याने शाळेतील शिक्षक मागील वर्षातील मुलांची पुस्तके जमा करुन ठेवतात. ती पुस्तके पुढच्या वर्षीच्या मुलांना वापरली जातात. शिक्षक जुन्या पुस्तकातून शिकवितात आणि विद्यार्थ्यांना जमा केलेल्या पुस्तकांचे वाटप केले जाते. मात्र, काही वेळेला मुले जास्त असली तर पुस्तके सर्वांच्या वाट्याला येत नाही. याठिकाणीदेखील मुलांना पुस्तकांची आदलाबदल करुन शिकावे लागते.

परीक्षेच्या निकालात घसरण

मागील दोन ते तीन वर्षांपूर्वी कोरोना काळातदेखील परीक्षेच्या अगदी आठवडाभर आधी पुस्तके मिळाली होती. त्यामुळे शिष्यवृत्ती निकाल 5 ते 6 टक्के इतका लागला होता. त्यानंतरही पुस्तके वेळेत न मिळाल्याने दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात घसरण होत आहे.

शिक्षण विभागाकडून पुस्तकांची रक्कम भरण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत विद्यार्थ्यांना पुस्तके मिळतील.

– संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग मनपा

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news