

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग, सर्व मान्यता प्राप्त परिसंस्था आणि सर्व संलग्नित महाविद्यालयांच्या पीएच.डी. प्रवेशित विद्यार्थ्यांची ऑनलाइन पद्धतीने शैक्षणिक पात्रता आता वर्षभरात कधीही करता येणार आहे. त्यासाठीची लिंक वर्षभर सुरूच ठेवण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठांतर्गत विद्यापीठ शैक्षणिक विभाग, सर्व मान्यताप्राप्त परिसंस्था आणि सर्व संलग्नित महाविद्यालयांत पीएच.डी. प्रवेशित विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता करावी लागते.
संबंधित पात्रता विद्यार्थ्याच्या प्रवेशास विद्यापीठाकडून मान्यता प्रदान केल्याचे पत्र दिल्यापासून पुढील दोन महिन्यांत शैक्षणिक पात्रतेची प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. परंतु, पीएच.डी.चे प्रवेश हे शैक्षणिक वर्षाप्रमाणे होत नाही.
तसेच, पीएच.डी. प्रवेशित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष हे पारंपरिक शैक्षणिक वर्षाप्रमाणे गणना न करता संबंधितांच्या प्रवेश दिनांकापासून केली जाते. म्हणून यापुढे पीएच.डी. प्रवेशित विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता पूर्ण करण्याची लिंक संपूर्ण वर्षभर सुरू ठेवण्यात येणार आहे.
त्यामुळे विद्यापीठातील विविध विभागांचे विभागप्रमुख, संलग्न महाविद्यालयांचे प्राचार्य, तसेच संशोधन संस्था यांना कळविण्यात येते की, हा बदल सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून द्यावा. तसेच, पीएच.डी. प्रवेशित विद्यार्थ्यांची ऑनलाइन शैक्षणिक पात्रता करण्याबाबतची मार्गदर्शक माहिती पुस्तिका संबंधितांना देण्यात आल्याचे देखील विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.