सासवड: सासवड शहराला पाणीपुरवठा होत असलेले 65.37 दशलक्ष घनफूट क्षमतेचे गराडे धरण असून, ते 100 टक्के भरले आहे. त्यामुळे सासवड शहर व परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. सध्या धरणातून कर्हा नदी तसेच पश्चिम भागातील सर्व बंधार्यांत विसर्ग सुरू आहे. ते भरल्यानंतर नाझरे धरणाकडे विसर्ग सुरू होईल, अशी माहिती गराडे पाटबंधारे शाखा अभियंता अविनाश जगताप यांनी दिली.
गराडे धरण भरल्याने स्थानिकांना दिलासा मिळाला आहे. या धरणातील पाण्याचे पूजन करताना जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गंगाराम जगदाळे आणि ग्रामस्थांनी केले. (Latest Pune News)
या वेळी भाजप पुरंदर तालुक्याध्यक्ष (पश्चिम) संदीप कटके, अॅड. शिवाजी कोलते, सरपंच नवनाथ गायकवाड, गोगलवाडीचे सरपंच अशोक गोगावले, चांबळीचे सरपंच गोपाळ कामठे, माजी उपसरपंच संजय कामठे, माजी सरपंच नीलेश जगदाळे, आस्करवाडीचे माजी सरपंच जालिंदर वाडकर, कोडीतचे माजी सरपंच नीलेश तळेकर, सुरज औचरे, हिवरेचे माजी सरपंच सुदर्शन कुदळे, शांताराम दळवी, सोमुर्डीचे माजी सरपंच सुनील पवार, माजी उपसरपंच बाळासाहेब रावडे, संदीप कदम, मयूर फडतरे, तंटामुक्ती अध्यक्ष योगेश जगदाळे, रोहित खवले, धोंडिबा खवले, हनुमंत खवले आदी उपस्थित होते.
कर्हा नदीवरील गराडे धरणातून सासवड शहरासह गराडे गावासह कोडीत खुर्द व बुद्रुक, चांबळी व हिवरे आदी गावांना पाणीपुरवठा केला जातो. सध्या चतुर्मुख महादेव मंदिर परिसर, दरेवाडी, थापे-बारवडी, राबडेवाडी, हनुमानवाडी, मठवाडी परिसरात संततधार पावसामुळे पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे कर्हा नदी प्रवाहित होत गराडे धरण 100 टक्के भरले आहे.
दुसरीकडे, परिसरातील पाझर तलाव बंधारे, विहिरी पूर्ण भरून वाहू लागल्या आहेत. या पाण्यामुळे या परिसरातील राहणार्या नागरिकांचा तसेच गुरे-ढोरे, बकर्या, वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तसेच, शेतीसाठी पाणी उपलब्ध झाल्याने शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, सासवड शहराला दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे, असे नगरपालिकेचे पाणीपुरवठा अभियंता संकेत नंदवंशी यांनी सांगितले.
पर्जन्यमानाची आकडेवारी
शुक्रवारी (दि. 20) पर्जन्यमानाची तालुक्यातील आकडेवारी पुढीलप्रमाणे सासवड 27 मि.मी., जेजुरी 22 मि.मी., भिवडी 55 मि.मी., परिंचे 14 मि. मी. वगळता राजेवाडी 14 मि.मी., वाल्हा 19 मि.मी., कुंभारवळण 16 मि.मी., शिवरी 21 मि.मी. पावसाची नोंद झाली नाही, अशी माहिती पुरंदर तहसीलमधील लिपिक नवनाथ आव्हाळे यांनी दिली.