

मंचर: काठापूर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील गणेशवस्तीवर ज्येष्ठ नागरिक ज्ञानेश्वर भागा जाधव (वय 75) व कमल ज्ञानेश्वर जाधव (वय 70) यांच्या घरी शनिवारी (दि. 21) पहाटे चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. चोरट्यांनी त्यांच्याकडील सात तोळे सोने चोरून नेले. पारगाव पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.
काठापूर बुद्रुक येथील गणेशवस्तीवर ज्ञानेश्वर व कमल जाधव हे राहतात. शनिवार पहाटे त्यांच्या घराच्या पाठीमागील बाजूच्या खिडकीची लोखंडी जाळी उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी घरात झोपलेल्या जाधव दाम्पत्यावर हल्ला केला. (Latest Pune News)
कमल जाधव यांच्या गळ्यातील दागिने हिसकाविण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला असता त्यास त्यांनी विरोध केला. चोरट्यांनी त्यांच्या पायावर लोखंडी गजाने मारहाण केली. यामध्ये त्यांचा पाय मोडला. ज्ञानेश्वर जाधव यांनीही प्रतिकार केल्याने त्यांच्याही पाठीवर चोरट्यांनी मारहाण केली.
चोरटे निघून गेल्यानंतर जखमी ज्ञानेश्वर जाधव यांनी नवनाथ जाधव यांना फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर वस्तीवरील ग्रामस्थ जमा झाले. खासगी रुग्णवाहिकेतून उभयतांना पारगाव शिंगवे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉ. शिवाजीराव थिटे यांनी त्यांच्यावर उपचार केले. एकूण तीन चोरटे होते. त्यांनी तोंडाला मफलर बांधली होती. घराच्या आजूबाजूला एक चप्पल आणि स्वेटर मिळाला. पोलिसांनी श्वान पथक मागविले होते. परंतु, माग मिळाला नाही.