जेजुरी: जोरदार पावसामुळे पुरंदर तालुक्याला वरदान ठरलेल्या नाझरे धरणात 75 टक्के पाणीसाठा झाला आहे. या धरणावर पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून असणार्या 56 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे मिटला आहे.
नाझरे धरणाची पाणीसाठा क्षमता ही पाऊण टीएमसी आहे. गतवर्षी अतिशय कमी पाऊस झाल्याने धरणात अत्यल्प पाणीसाठा झाला होता. त्यामुळे पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले होते. या धरणावर जेजुरी शहर, जेजुरी औद्योगिक वसाहत, बारामती तालुक्यातील मोरगाव व सोळा गावे, माळशिरस पारगाव योजना, पांडेश्वर मावडी योजना यातून 56 गावांना पिण्याचे पाणी दिले जाते. (Latest Pune News)
सुमारे तीन हजार हेक्टर शेती हंगामी स्वरूपात धरणातील पाण्यामुळे ओलिताखाली येते.या वर्षी मे महिन्यात मान्सूनपूर्व पाऊस जोरदार झाल्याने मे महिन्यातच कर्हा नदी वाहू लागली. जून महिन्याच्या दुसर्या आठवड्यात धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने कर्हा नदीवरील नाझरे धरणात पाणीसाठा सुरू झाला. मे महिनाअखेर धरणात 188 दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक होता. आजअखेर 600 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. धरण सध्या 75 टक्के भरले आहे.
पुरंदर तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान 496 असून मे आणि जून महिन्यात पडलेल्या पावसाने सरासरी पावसाची पातळी ओलांडली आहे. आतापर्यंत 500 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
कर्हा नदीवरील गराडे धरण भरून वाहत असल्याने कर्हा नदीच्या पात्रात पाणी वाढले आहे. जूनअखेर धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. धरणावर अवलंबून असणार्या पुरंदर व बारामती तालुक्यातील 56 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न धरणातील पाणीसाठ्यामुळे मिटला आहे.