Sassoon drug case : ससून… हे वागणं बरं न्हवं! ललित पाटील प्रकरणाची सुई टोचणार कनिष्ठ महिला डॉक्टरला

Sassoon drug case : ससून… हे वागणं बरं न्हवं! ललित पाटील प्रकरणाची सुई टोचणार कनिष्ठ महिला डॉक्टरला
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : तुरुंगातील मुक्काम टळावा यासाठी ड्रग्ज माफिया, आर्थिक घोटाळ्यात आरोपी असलेला माजी आमदार आणि इतर हायप्रोफाइल गुन्ह्यातील व्यक्तींना ससूनने विशेष सुविधा दिल्याचे समोर आले आहे. यात ससून प्रशासनाचे पुरते वाभाडे निघाल्यानंतर वरिष्ठांना वाचविण्यासाठी बळीचा बकरा शोधण्यात आला आहे.

माजी आमदार आरोपीला रुग्णालयातून सोडण्याची शिफारस करणाऱ्या डॉक्टरास सक्तीच्या रजेवर पाठवले असून, ललित पाटील प्रकरणात आणखी एका कनिष्ठ महिला डॉक्टरला गोवण्याची हालचाल ससून प्रशासनाने सुरू केली आहे. यामुळे वरिष्ठ अधिकारी नामानिराळेच राहणार आहेत. ससून प्रशासनाचं हे वागणं बरं नसल्याचं यावरून दिसून येत आहे.

या प्रकरणाशी संबंधित वरिष्ठ अधिका-यांनी दै. 'पुढारी'च्या बातमीदारास दिलेल्या खात्रीशीर माहितीनुसार, ड्रगमाफिया ललित पाटील प्रकरणानंतर ससूनमध्ये अंतर्गत संघर्ष निर्माण झाला आहे. या प्रकरणाचे खापर काेणावर फोडायचे? यासाठी वरिष्ठ लॉबी कामाला लागली आहे. नेहमीप्रमाणे त्याचे खापर कनिष्ठांवर फोडून प्रकरण दाबण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

ललित पाटीलसह बरेच कैदी ससूनच्या वॉर्ड क्रमांक 16 मध्ये अनेक महिन्यांपासून मुक्कामाला असल्याचे वृत्त सर्वात प्रथम दै. 'पुढारी'ने उघडकीस आणले. त्यानंतर पोलिसांसह ससून प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. राज्य शासनाकडूनही विचारणा करण्यात आली. त्यानंतर दोनच दिवसांमध्ये वॉर्डमधील नऊपैकी पाच कैद्यांना लगबगीने कारागृहात पाठवण्यात आले.

कैद्यांची रवानगी करून स्वत:चा बचाव करता येईल, असे ससूनमधील डॉक्टरांना वाटले होते. मात्र, आता यातून सुटका होणार नाही, असे लक्षात आल्याने जबाबदारी कनिष्ठांवर ढकलण्याची तयारी वरिष्ठ डॉक्टरांनी सुरू केल्याची ससूनमध्ये चर्चा सुरू आहे. ललित पाटील प्रकरणात पोलिसांसह ससूनमधील डॉक्टरांचाही हात असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

राजकीय दबावामुळे कैद्यांना अभय देत असलेल्या डॉक्टरांनी स्वत:चे खिसेही भरून घेतले. कैद्यांना दाखल करून घेणारे आणि तपासणारे डॉक्टर, आर्थिक हितसंबंध जोपासून कैद्यांना आश्रय देणारे वरिष्ठ अधिकारी या सर्वांनाच चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. संबंधित प्रकरणाला जबाबदार कोण, याचे लेखी उत्तरही द्यावे लागणार आहे. त्यामुळे आपले नाव खराब होऊ नये, यासाठी ज्युनियर महिला डॉक्टरवर हे प्रकरण शेकवले जाणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

माजी आमदाराच्या डिस्चार्जची शिफारस करणारा डॉक्टर सक्तीच्या रजेवर

माजी आमदार अनिल भोसलेला उपचारांची गरज नाही, डिस्चार्ज दिला जावा, अशी शिफारस ड्रग्ज प्रकरण उघडकीस येण्यापूर्वीच करण्यात आली होती. मात्र, तरीही त्याला पंधरा दिवस ससूनमध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान, ललित पाटील ड्रग्ज प्रकरण उजेडात आले. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाल्यानंतर पंधरा दिवसांपूर्वी दिलेल्या शिफारसीवर तातडीने निर्णय घेण्यात आला. भोसले याची रवानगी येरवडा कारागृहात झाली. मात्र, भोसलेला रुग्णालयातून सोडण्याची शिफारस केल्यानंतरही त्याला ससूनमध्ये ठेवण्याचा निर्णय एका अधिकाऱ्याने घेतला होता. त्या अधिकाऱ्यास सोडून भोसलेच्या डिस्चार्जची शिफारस करणाऱ्या डॉक्टरलाच सक्तीच्या रजेवर पाठवण्याची 'कामगिरी' ससून प्रशासनाने केली आहे.

कागदपत्रे बदलल्याची चर्चा

ससून रुग्णालयातील कैद्यांचा अहवाल अद्याप गोपनीय ठेवला आहे. प्रत्यक्षात कैद्यांच्या उपचारांबाबत माहिती द्यावी लागणार असल्याने त्यांचे आजार, उपचार, तपासणी करणारे डॉक्टर यांची माहिती असलेली वैद्यकीय कागदपत्रेच बदलण्यात आल्याचीही चर्चा आहे.

पुढारीचे सवाल

  • माजी आमदार भोसलेंना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याची शिफारस केल्यानंतरही रुग्णालयातील मुक्काम वाढविण्याचा निर्णय कुणाचा?
  • हायप्रोफाइल गुन्हेगारांना पाठीशी घालण्यात बाहेरील कोणत्या शक्तींचा हात आहे?
  • रुग्णालयात विशेष सुविधा घेणारे आरोपी नेमके आजारी होते का? त्यांना नेमका कोणता आजार होता? त्यासाठी इतके दिवस रुग्णालयात ठाण मांडण्याची गरज होती का? याची त्रयस्थांमार्फत राज्य सरकार चौकशी करणार का?

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news