Sassoon Drug Case ; ’जे काही आहे, ते आपल्यातच ठेवा’; ससूनमध्ये अधिकार्‍यांची कनिष्ठांना तंबी

Sassoon Drug Case ; ’जे काही आहे, ते आपल्यातच ठेवा’; ससूनमध्ये अधिकार्‍यांची कनिष्ठांना तंबी
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ससून रुग्णालयातील ड्रग प्रकरणातील आरोपी ललित पाटील पळून गेल्याच्या घटनेला तब्बल पंधरा दिवस उलटून गेले आहेत. ससूनमध्ये पाटीलसाठी कशी फिल्डिंग लावली गेली, याबाबत डॉक्टर अणि कर्मचा-यांमध्ये खासगीत चर्चा रंगत आहेत. मात्र, चौकशीचा ससेमिरा सुरू झाल्याने वरिष्ठांनी कनिष्ठांना 'जे काही आहे, ते आपल्यातच ठेवा,' अशी अप्रत्यक्ष तंबीच दिली आहे. ललित पाटील ड्रग प्रकरणानंतर अकरा दिवसांनी राज्य शासनाने ससून प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली. समितीने तब्बल 80 जणांचे जबाब नोंदवून घेतले. तसेच, गरज भासल्यास ती समिती पुन्हा ससूनमध्ये येणार असल्याचे सांगण्यात आले.

त्यामुळे ससूनमध्ये जे काही घडले, ते आपल्यातच रहावे, त्याची जगजाहीर चर्चा होता कामा नये, यासाठी आता ससूनमधील वरिष्ठांनी डॉक्टर आणि कर्मचार्‍यांना अलिखित फर्मान सोडले आहे. ललित पाटील जून महिन्यापासून ससून रुग्णालयात ठाण मांडून होता. त्याआधीही गेल्या तीन वर्षांमध्ये बारा-तेरा महिने तो ससूनमध्ये होता. ललित पाटीलला नेमका काय आजार होता, त्याच्यावर कोणी उपचार केले, त्याला इतके दिवस ससूनमध्ये ठेवून घेण्याची शिफारस कोणी केली, याबाबत जाणीवपूर्वक मौन बाळगण्यात आले आहे.

पोलिसांच्या मदतीने पाटील पळून गेला असल्याने नऊ पोलिसांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले. मात्र, ससून रुग्णालयातील एकाही अधिकारी आणि कर्मचा-याला साधी 'कारणे दाखवा' नोटीसही बजावण्यात आलेली नाही. त्यामुळे ससूनच्या प्रकरणात दोषी असणार्‍यांना राज्य शासनच पाठीशी घालत असल्याची चर्चा ससून रुग्णालय परिसरात सुरु आहे.

कर्मचार्‍यांमध्ये कुजबूज

ललित पाटील पळून गेला तेव्हा काही सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते तर काही फिरवून ठेवण्यात आले होते. काही वेळ वीजही बंद करण्यात आल्याचे निदर्शनास आले. ललितची दुस-या दिवशी शस्त्रक्रिया केली जाणार होती. त्यापूर्वी त्याला एक्स-रे काढण्यासाठी नेण्यात येत होते. ललित कैदी असला तरी रुग्ण म्हणून दाखल झाल्याने त्याच्या उपचारांबाबत डॉक्टरांना इत्थंभूत माहिती होती. ललितकडून डॉक्टरांना आणि पोलिसांना पैसे दिले जात असल्याचीही चर्चा रंगली. त्यामुळेच ससूनमधील डॉक्टर सर्व प्रकरणाबाबत अनभिज्ञ असणे शक्य नाही. यामध्ये कोणाचा हात असू शकतो, घटनाक्रम कसा घडला, याबाबत ससूनमधील कर्मचा-यांमध्ये कुजबूज आहे. मात्र, वरिष्ठांकडून सूचना आल्याने कोणीही बोलायला तयार नाहीत.

बोलताना सावधगिरी

एरव्ही पत्रकारांशी मैत्रीपूर्ण संवाद साधणारे डॉक्टर आणि कर्मचारीही आता ससूनच्या आवारात बोलताना सावधगिरी बाळगत आहेत. ललित पाटील प्रकरणाचा विषय जाणीवपूर्वक टाळला जात आहे. ससूनमधील अंतर्गत माहिती कर्मचा-यांकरवी पत्रकारांपर्यंत पोहोचू नये, यासाठी वरिष्ठांनी 'विशेष सूचना' दिल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news