

पुणे: बकरी ईद, बासी ईद तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महापालिकेने सारसबाग उद्यानातील प्रवेश 28 आणि 29 मे रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आहे. या कालावधीत परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्याची मागणीही महापालिकेकडून करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी यासंदर्भात पोलिस आयुक्तांना पत्र पाठवून सारसबाग परिसरात विशेष सुरक्षाव्यवस्था तैनात करण्याची विनंती केली आहे.
दरम्यान, हिंदू जनजागृती समिती आणि समस्त हिंदू आघाडी यांनी सारसबागेसंदर्भात विविध मागण्या प्रशासनाकडे केल्या होत्या. मात्र, सावरकर जयंती कार्यक्रमासाठी सारसबागेत परवानगी देण्यात आलेली नाही. कारण, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा उद्यानाच्या बाहेरील भागात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
विरोध वाढताच उद्यान बंदचे बदलले कारण
दि. 28 आणि 29 मे रोजी बंद सारसबाग बंद ठेवण्याच्या निर्णयावरून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड संताप आणि संभम निर्माण झाला आहे. महापौर मंजूषा नागपुरे यांनी सुरुवातीला ‘दुरुस्ती आणि डागडुजी’चे कारण पुढे करत सारसबाग बंद ठेवणार असल्याचे घोषित केले. त्याबाबतची सोशल मीडियावर पोस्टही केली. मात्र, त्यावरून मोठे वांदग उभे राहण्याची शक्यता आहे हे लक्षात येताच महापौरांनी ही पोस्ट सोशल मीडिया टीमची ही चूक असल्याचे सांगत पोस्ट डिलीट केले आणि पोलिसांच्या कायदा-सुव्यवस्थेचा हवाला देत बाग बंद असल्याचे नागपुरे यांनी स्पष्ट केले.
सारसबाग दोन दिवस बंद राहणार असल्याचे समजताच महापौरांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून, ‘उद्यान विभागामार्फत बागेची दुरुस्ती व डागडुजी होणार असल्याने बाग बंद राहील, ‘अशी पोस्ट प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, प्रसारमाध्यमांनी महापालिकेच्या उद्यान विभागाशी संपर्क साधला असता, ‘आम्हाला अशा कोणत्याही दुरुस्तीच्या कामाची कल्पनाच नाही‘ असे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. हा गंभीर प्रकार समोर आल्यावर महापौरांनी तातडीने ती पोस्ट डिलीट केली आणि सोशल मीडिया टीमची चूक असल्याचे माध्यमांना सांगत सारवासारव केली. हा निर्णय आमचा किंवा पालिकेचा नाही, तर पुणे पोलिसांनी घेतलेला आहे. माझ्या प्रभागातील दुसऱ्या एका उद्यानाच्या डागडुजीची माहिती टीमने चुकून सारसबागेसाठी पोस्ट केली.
सामाजिक संस्थांनी केला निर्णयाचा निषेध
आगामी बकरी ईद व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आधीच पुढील 14 दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. दरम्यान, सारसबाग बंद ठेवण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे सांगत अनेक सामाजिक संस्थांनी याचा निषेध केला आहे.
उद्यानाच्या कामासाठी बाग बंद ठेवणे चुकीचे आहे. सध्या सुट्या असल्याने अनेक नागरिक व लहान मुले या ठिकाणी येत असतात. बागेचे काम टप्प्याटप्प्याने करता येणे शक्य आहे. त्यामुळे ही बाग बंद ठेवू नये.
नीलेश निकम, विरोधी पक्षनेते, महापालिका