

पुणे: रेणुकानगरी वडगाव बुद्रुक येथील गजानन ज्वेलर्स या सराफी पेढीतून पिस्तूल आणि कोयत्याच्या धाकाने दागिने लुटून फरार झालेल्या तिघा चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने अहिल्यानगर येथून अटक केली. त्यांच्या एका अल्पवयीन साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नांदेड सिटी पोलिसांनी अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले होते. सराफी पेढीची रेकी करून लूट करण्यात आल्याचे तपासात पुढे आले आहे.
वरदन खरटमल (वय 20, रा. शांताईनगर, पठार वस्ती, वडगाव), अमर बाभळे (वय 20, रा. धबाडी, वडगाव बु.) आणि ओंकार शिंदे (वय 22, रा. मानाजीनगर, नर्हे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून साडेचार लाखांचा ऐवज जप्त केला आहे. यातील वरदन आणि ओंकार हे दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. (Latest Pune News)
सराफ व्यावसायिक मंगल घाडगे (वय 55, रा. सदाशिव दांगटनगर, धबाडी, आंबेगाव) यांचे गजानन ज्वेलर्स हे सराफी दुकान वडगाव बुद्रुक येथे आहे. मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास दोन दरोडेखोर दुकानात शिरले. त्यावेळी त्यांचा एक साथीदार बाहेर दुचाकीवर बसून होता. त्यांच्यातील एकाने हातातील कोयता व पिस्तुलाचा धाक दाखवून सोन्याचे दागिने हिसकाविण्याचा प्रयत्न केला. त्याला मंगल घाडगे यांनी प्रतिकार केला. तेव्हा दरोडेखोराने त्यांच्या डोक्यात व हाताचे दंडावर कोयत्याने हल्ला केला.
त्यामध्ये त्या जखमी झाल्या. दरोडेखोरांनी कपाटाच्या काचा हत्याराने फोडून कपाटामधील 4 लाख 50 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. दुचाकीवरून जाताना त्यांनी हातातील पिस्तुल व लोखंडी हत्यारे हवेत फिरवत लोकामध्ये दहशत निर्माण करुन पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईगडे व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळाला भेट दिली.
दरोडेखोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. दरम्यान, गुन्हे शाखेच्या सर्व पथकांकडून या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू करण्यात आला होता. नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज चेक करुन आरोपी निष्पन्न केले. गुन्ह्यातील अल्पवयीन मुलाला काही तासात ताब्यात घेतले. तो दुचाकी चालवत होता. त्याकडून गुन्ह्यात वापरलेले मोटारसायकल जप्त करण्यात आली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या युनिट तीन आणि सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या पथकाने अहिल्यानगर येथून या तिघांना ताब्यात घेतले.
सराफी पेढीतून दागिणे लुटण्याचे काम वरदन, अमर आणि विधीसंघर्षीत मुलाने केले. परंतू त्यावेळी ओंकार हा तेथे नव्हता. त्यानेच रेकी करून ही सराफी पेढी लुटण्याचे नियोजन केले. आरोपींनी लुटलेला ऐवज एका व्यक्तीला दिला होता. असे पोलिसांनी सांगितले.