पुणे: शहरातील बेकायदेशीर होर्डिंग्सचा प्रश्न ऐरणीवर आला होता. महानगर पालिकेने केलेल्या पाहणीत केवळ 24 अनधिकृत होर्डिंग्स असल्याचा दावा करण्यात आला होता. यावर खुद्द नव नियुक्त आयुक्तांनी शंका व्यक्त केली होती.
त्यांनी दिलेल्या आदेशानंतर या 24 पैकी 22 होर्डिंग्स पाडण्यात आल्याचा दावा महानगर पालिकेच्या आकाश चिन्ह विभागाने केला आहे. मात्र, प्रत्यक्षात 15 क्षेत्रीय कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त मात्र, त्यांच्या हद्दीतील अनधिकृत होर्डिंग्सची माहिती लेखी स्वरूपात देण्यास टाळाटाळ करत असून या मुळे या कारवाईवर व अनधिकृत होर्डिंग्सच्या आकडेवारीबद्दल संदिग्धता निर्माण झाली आहे. (Latest Pune News)
महापालिकेच्या हद्दीत कोणतेही होर्डिंग उभारण्यासाठी आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते. परवाना घेतल्यानंतरही ठरावीक अटींचे पालन करणे बंधनकारक असते. परवानाधारकांनी आपल्या होर्डिंगवर पिवळ्या रंगाचा नामफलक लावणे आवश्यक असते, ज्यावर होर्डिंगचा क्रमांक आणि एजन्सीचे नाव नमूद असते.
तसेच, या परवान्यांचे दरवर्षी नुतनीकरण करणेही आवश्यक आहे. परंतु परवानगी न घेता अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या होर्डिंग्सवर कारवाई केली जाते, असे नियम असूनही, अनेकदा राजकीय हस्तक्षेप आणि प्रशासनातील काही अधिकार्यांशी असलेले साटेलोटे यामुळे कारवाईला बगल दिली जाते.
कधी कधी अशा अनधिकृत व धोकादायक पद्धतीने उभारलेल्या होर्डिंग्समुळे दुर्घटना घडते, तेव्हाच प्रशासन जागे होते. अनेक चौक, रस्ते आणि पदपथांलगत अनधिकृत आणि नियमबाह्य होर्डिंग्स उभे असल्याचे सहज पाहायला मिळते. विशेष म्हणजे, परवानाधारक होर्डिंग्सही काही वेळा अप्रामाणिक पद्धतीने व धोकादायक स्थितीत उभारलेले असतात.
नवीन आयुक्त नवल किशोर राम यांना विभागाकडून सादर करण्यात आलेल्या अहवालात केवळ 24 अनधिकृत होर्डिंग्स असल्याची माहिती देण्यात आली होती. या संख्येवर विश्वास बसत नसल्याने त्यांनी विशेष पथक तयार करून सर्व होर्डिंग्सची पडताळणी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.
तसेच आठवडाभरात सर्व अनधिकृत होर्डिंग्स हटवून संबंधितांवर पोलिस कारवाई करण्याचे निर्देशही दिले होते. या आदेशाला पंधरा दिवस उलटले तरीही अनेक क्षेत्रीय कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त आपापल्या हद्दीतील अनधिकृत होर्डिंग्सची माहिती लेखी स्वरूपात देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या उपायुक्तांनी संबंधित अधिकार्यांना खुलासा देण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. परंतु आठवड्यांनंतरही या नोटिसांना कोणताही लेखी प्रतिसाद मिळालेला नाही.
19 होर्डिंग्स पाडले
आकाशचिन्ह व परवाना विभागाने आयुक्तांना सादर केलेल्या कारवाई अहवालानुसार, 24 अनधिकृत होर्डिंग्सपैकी 19 पाडण्यात आले आहे. तर इतर पाच प्रकरणांमध्ये न्यायालयीन वाद सुरू आहेत. त्यापैकी तीन प्रकरणांतील स्थगिती नुकतीच न्यायालयाने उठवली आहे. त्यामुळे ते होर्डिंग्स पाडून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे आता केवळ दोन अनधिकृत होर्डिंग्स शिल्लक राहिल्याचा दावा आकाशचिन्ह विभागाने केला आहे.
काही क्षेत्रीय कार्यालयांनी आपल्या हद्दीत एकही अनधिकृत होर्डिंग नसल्याचे लेखी कळवले आहे. जे होर्डिंग्स अनधिकृत होते, ती सर्व हटवण्यात आली असल्याचेही सांगण्यात आले आहे. मात्र त्यांनी विभागाच्या नोटिसांना अजूनही लेखी उत्तर दिलेले नाही. त्यामुळे, अशा कार्यालयांमध्ये स्वतः पाहणी करून वस्तुस्थितीची पडताळणी करण्यात येईल.
- संतोष वारुळे, उपायुक्त आकाशचिन्ह व परवाना विभाग