

सासवड: आषाढी वारीच्या अखंड भक्तिपरंपरेतील अत्यंत भावस्पर्शी क्षण रविवारी (दि. १२) सासवड येथे अनुभवायला मिळाला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू संत सोपानदेव महाराज यांच्या पालखीने हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. ज्येष्ठ वद्य द्वादशी हा दिवस संत निवृत्तीनाथ महाराजांचा समाधीदिन असल्याने, परंपरेप्रमाणे प्रस्थानापूर्वी
धन्य धन्य निवृत्तीदेवा | काय महिमा वर्णावा ||
शिवे अवतार धरून | केले त्रैलोक्य पावन ||
समाधी त्र्यंबक शिखरी | मागे शोभे ब्रह्मगिरी ||
निवृत्ती नाथाचे चरणी |शरण एका जनार्दनी ||
हा अभंग गाऊन टाळ-मृदंगांचा निनाद, 'ज्ञानोबा-तुकाराम' आणि 'जय जय राम कृष्ण हरी'च्या अखंड गजरात पालखी सोहळा उत्साहात मार्गस्थ झाला.
पहाटे चार वाजता समाधीची पूजा, आरती व धार्मिक विधी झाले. सकाळी ५ वाजेल्यापासून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. दिवसभर हजारो भाविकांनी संत सोपानदेव महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. सकाळी साडेअकरा वाजता प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वप्रथम मानाच्या दिंड्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. दिंडी प्रमुखांचे मानाचे अभंग झाल्यानंतर देवघरातून संत सोपानदेव महाराजांच्या पादुका विधिवत आणण्यात आल्या.
दरम्यान, पालखी सोहळा प्रमुख ॲड. त्रिगुण गोसावी यांनी देव घरातून सोपानकाकांच्या पादुका आणून अण्णासाहेब केंजळे यांचा हातात देऊन वीणा मंडपातील पालखीमध्ये विधिवत स्थानापन्न केल्या. त्यानंतर संत सोपानदेव देवस्थान ट्रस्ट व सासवड नगरपालिकेच्या वतीने दिंडी प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. दुपारी साडेबारा वाजता पालखीने मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करून पूर्व दरवाजातून प्रस्थान केले. सासवडकरांनी पालखी खांद्यावर घेत सासवड शहरातून जेजुरी नाक्यापर्यंत मिरवणूक काढली.
यंदाच्या पालखी सोहळ्यात तब्बल १२२ दिंड्या आणि एक लाखांहून अधिक वारकरी सहभागी झाले आहेत. पालखी रथासाठी विकास केंजळे (सोरटेवाडी) यांच्या बैलजोडीला मान मिळाला असून, सागर आणि सुंदर ही बैलजोडी रथ ओढत आहे. नितीन कुलकर्णी हे नगारावाहनाची जबाबदारी पार पाडत आहेत. स्वर्गीय चंदुकाका जगताप यांच्या स्मरणार्थ देवस्थानाला अर्पण केलेला अश्व, तसेच राजा आणि राम हे मानाचे अश्वही पालखीसोबत मार्गक्रमण करीत आहेत.
जेजुरी नाक्यावर नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, नगरसेवक-नगरसेविकांनी स्वागत केले. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास पालखीला निरोप देण्यात आला.
या वेळी माजी आमदार संजय जगताप, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम रजपूत, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, पोलिस निरीक्षक संतोष घोळवे, शिवसेना अध्यात्मिक क्रांतिवीर संघटनेचे अध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांच्यासह पंढरपूर, आळंदी, देहू, मुक्ताईनगर, त्र्यंबकेश्वर आदी देवस्थानांचे प्रतिनिधी, दिंडी प्रमुख आणि हजारो भाविक उपस्थित होते.