Akshar Wari: ज्ञानेश्वरीतील तत्त्वज्ञान आणि विज्ञान

संत ज्ञानेश्वर माऊलींनी सुमारे साडेसातशे वर्षांपूर्वी भावार्थदीपिका हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ पुढे सर्वत्र ‘ज्ञानेश्वरी’ या नावाने प्रसिद्ध झाला.
Akshar Wari
Akshar WariPudhari
Published on
Updated on

माझा मराठाचि बोलू कौतुके... परी अमृतातेही पैजा जिंके, असे आश्वासित करत संत ज्ञानेश्वर माऊलींनी सुमारे साडेसातशे वर्षांपूर्वी भावार्थदीपिका हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ पुढे सर्वत्र ‘ज्ञानेश्वरी’ या नावाने प्रसिद्ध झाला. केवळ वारकरी संप्रदायासाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी वंदनीय ठरलेला हा ग्रंथ गेली साडेसातशे वर्षे आपल्या अवीट गोडीने मराठी मनाला भुरळ घालत आहे.

श्रीमद्‍भगवद्गीता हा मूळ ग्रंथ संस्कृत भाषेत असल्याने त्यातील तत्त्वज्ञान सामान्य जनतेस सहज उपलब्ध नव्हते. त्यामुळे माऊलींनी त्यावर हा विस्तृत टीका ग्रंथ लिहिला. भगवद्गीतेतील ७०० श्लोकांचे रसग्रहण करताना त्यांनी तब्बल ९,००० ओव्यांमधून त्याचा विस्तार केला.

अध्यात्म किंवा परमार्थ हा विषय अनेकदा विज्ञानाच्या विरोधात असल्याचा समज केला जातो. मात्र, विज्ञानवादी दृष्टिकोनातून ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला असता आधुनिक विज्ञानातील अनेक संकल्पनांशी साधर्म्य दर्शविणारा विचार त्यामध्ये आढळून येतो. याचा अर्थ असा नाही की, ज्ञानेश्वर माऊलींनी आधुनिक वैज्ञानिक सिद्धांत मांडले; मात्र त्यांनी निसर्ग, जीवन आणि विश्व यांविषयी केलेले चिंतन अनेक वैज्ञानिक संकल्पनांशी आश्चर्यकारक साधर्म्य दर्शविते.

पाश्चात्‍य देशांतील शास्त्रज्ञांनी भौतिक व रासायनिक तत्त्वांचा शोध घेत विविध सिद्धांत मांडले आणि त्यावर आधारित विज्ञानाचा विकास केला. याउलट, भारतीय ऋषी-मुनींनी मानवाचे खरे स्वरूप, आनंदाचे मूळ आणि जीवनाचे अंतिम ध्येय यांचा शोध घेतला. या शोधयात्रेत त्यांना निसर्गातील अनेक सूक्ष्म नियमांचे आकलन आपसुुच झाले असावे, असे वाटते.

श्रीमद्‍भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी यांचा अभ्यास करताना अनेक ठिकाणी आधुनिक वैज्ञानिक विचारांशी साधर्म्य आढळते. त्यांमध्ये काही गोष्टींवर आपण विचार करू.

ऊर्जा अक्षय्यतेचा नियम

ऊर्जा अक्षय्यतेचा नियम एकोणिसाव्या शतकात विकसित झाला. या नियमानुसार ऊर्जा निर्माण किंवा नष्ट होत नाही; ती केवळ एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतरित होते. गीतेच्या चौथ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की, हा योग मी पूर्वी सूर्याला (विवस्वान) सांगितला, त्याने तो मनूला आणि मनूने पुढे इक्ष्वाकूला सांगितला.

हे वाचताच आपल्यासारख्या सामान्यालाही यात काहीतरी गडबड आहे, असेच वाटते. मग ज्ञानी असणाऱ्या अर्जुनाला सुद्धा तशीच शंका आल्याचे दिसून येते. आणि मग कोणतीही भीडभाड न ठेवता तो भगवंतांना सरळ विचारतो, ‘कृष्णा तू आणि मी एकाच वर्गीचे. असे असताना तू इतक्या प्राचिन काळी सूर्याला उपदेश केला असे म्हणतोस, ते कसं काय बरं?’ तेव्हा श्रीकृष्ण उत्तर देतात की, तुझे आणि माझे अनेक जन्म झाले आहेत. या पुढेही अनंत काळापर्यंत ते होत राहतील.

ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायात माऊली म्हणतात... ‘उपजे ते नाशे । नाशले पुनरपि दिसे । हे घटिकायंत्र तैसे । परिभ्रमे गा ॥’ या ओवीत जन्म, मृत्यू आणि पुनरावृत्ती यांचा उल्लेख आहे. आधुनिक ऊर्जा अक्षय्यतेच्या नियमाशी याचे काही प्रमाणात संकल्पनात्मक साधर्म्य दिसून येते. अर्थात, दोन्हींचा संदर्भ भिन्‍न असला तरी परिवर्तन आणि सातत्य यांची कल्पना समान भासते. (क्रमश:)

- केशव जाधव, कागल (कोल्हापूर)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news