

सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सतराव्या शतकात मांडला. पृथ्वी प्रत्येक वस्तूला स्वतःकडे आकर्षित करते, ही त्यामागील मूलभूत कल्पना. ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात माऊली म्हणतात, "पै परिपाकाचिये वेळे । फळ देठे ना देठू फळे ॥" फळ पिकल्यावर ते देठापासून विलग होऊन खाली पडते, हे निरीक्षण माऊलींनी सहजपणे नोंदवले आहे.
ते खालीच का पडते, याचे उत्तर माऊलींच्या कर्माची महत्ता वर्णन करणाऱ्या दुुसऱ्या एका ओवीवरून मिळते. "का नापदितां गती, चरणी जैसे अथी, नातरी ते दीप्ती, दीपबिंबी..." म्हणजेच, "गती (बाहेरून कुठून) संपादित न करता, ती जशी पायात (स्वाभाविक) आहे किंवा दिव्याच्या ज्योतीच्या ठिकाणीच तिचा प्रकाश सहज स्वाभाविक आहे..." गुरुत्व बलाच्या अस्तित्वाचं दर्शन यातून होतं. या वर्णनात गुरुत्वाकर्षणाचा स्पष्ट वैज्ञानिक सिद्धांत नसला तरी निसर्गातील घटनांचे बारकाईने केलेले निरीक्षण दिसून येते.
न्यूटनच्या गतीविषयक नियमांशी साधर्म्य
सतराव्या शतकातील महान शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन यांनी गतीविषयक तीन नियम मांडले. त्यापैकी पहिला नियम जडत्वाची व्याख्या सांगतो. या नियमानुसार, कोणतीही वस्तू बाह्य बल लागू होईपर्यंत तिची स्थिर किंवा गतिमान अवस्था कायम ठेवते. ज्ञानेश्वरीतील एका ओवीत माऊली म्हणतात, "जे चळे ना ढळे । सरे ना मैळे । ते आपुलेनीचि बळे । अंगविले जी ही ॥" या ओवीचा मुख्य संदर्भ आध्यात्मिक असला तरी वस्तूच्या स्वभाव धर्माविषयीचा विचार येथे दिसून येतो. त्यामुळे काही अभ्यासकांना या विचारात जडत्वाच्या संकल्पनेशी साधर्म्य जाणवते.
सूर्यकेंद्री सिद्धांताशी साधर्म्य
सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, अशी समजूत प्राचीन काळी प्रचलित होती. निकोलस कोपर्निकस यांनी सोळाव्या शतकात पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सूर्यकेंद्री सिद्धांत मांडला. पुढे गॅलिलिओ यांनी त्यास पाठिंबा दिला. ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायात माऊली म्हणतात, "आणि उदोअस्तुचेनि प्रमाणे । जैसे न चालता सूर्याचे चालणे । तैसे नैष्कर्म्यत्व जाणे । कर्मीची असता ॥" या ओवीत माऊलींना स्थितप्रज्ञाचे स्वरूप स्पष्ट करायचे आहे. तथापि, "न चालता सूर्याचे चालणे" या उल्लेखातून सूर्याच्या प्रत्यक्ष गतीपेक्षा भासमान गतीचा संदर्भ दिसून येतो. त्यामुळे काही अभ्यासकांना या ओवीत सूर्यकेंद्री विचारांशी साधर्म्य जाणवते.
तात्पर्य
पाश्चात्त्य शास्त्रज्ञांनी भौतिक जगाचा अभ्यास करून विज्ञानाचा विकास केला, तर भारतीय संतांनी मानवी जीवन, चेतना आणि आत्मस्वरूप यांचा शोध घेतला. या दोन्ही मार्गांचे उद्दिष्ट वेगवेगळे असले तरी सत्याचा शोध हे त्यांचे समान ध्येय होते. ज्ञानेश्वरी हा मुख्यतः अध्यात्म, तत्त्वज्ञान व जीवनमूल्यांचा ग्रंथ आहे. तथापि, त्यातील अनेक विचार आधुनिक विज्ञानातील काही संकल्पनांशी साधर्म्य दर्शवितात. त्यामुळे ज्ञानेश्वरीचा अभ्यास केवळ धार्मिक किंवा आध्यात्मिक दृष्टीनेच नव्हे, तर तर्कनिष्ठ आणि चिंतनशील दृष्टिकोनातूनही केला जाऊ शकतो. ज्ञानेश्वर माऊलींची दृष्टी व्यापक, निरीक्षणप्रधान आणि तर्कसुसंगत होती. त्यामुळे ज्ञानेश्वरी आजही अध्यात्म, विज्ञाननिष्ठता आणि विचारविश्व यांमधील एक महत्त्वाचा सेतू म्हणून अभ्यासकांना प्रेरणा देत आहे.
केशव जाधव, कागल (कोल्हापूर)