

पुणे : मोबाईल हरवला, सायबर फसवणूक झाली, कुणी पैसे मागण्यासाठी कॉल करीत असेल तर तत्काळ त्या नंबरची ‘संचार सारथी’ या मोबाईल ॲपवर तक्रार करा. त्यानंतर तुम्हाला पंधरा दिवसांत याचा छडा लावून मिळेल, हे उद्गार आहेत शहरातील डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम अर्थात डीओटीच्या संचालकांचे.(Latest Pune News)
डीओटीचे संचालक प्रमोद सपकाळे यांच्या पुढाकाराने एक मोहीम शहरात घेतली जाणार आहे. त्यात तुमचा मोबाईल हरवला, तर काय करायचे. तुम्ही सायबर चोरीचे शिकार झाला असेल तर किंवा विदेशी नंबरवरून तुमची कोणी फसवणूक करीत असेल तर नेमके काय करायचे, याची माहिती पुण्यातील डीओटीची टीम देत आहे. मंगळवारी सकाळी 10.30 वाजता टीम डीओटी स्वारगेट बसस्थानकावर पोहचली. या वेळी पुणे डीओटीचे संचालक प्रमोद सपकाळे, स्वारगेटचे आगारप्रमुख बालाजी सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी प्रवाशांना ’संचार सारथी’ ॲपची माहिती देत त्याचे फायदे सांगितले. धकाधकीच्या जीवनात मोबाईल हरवला तर कुठे तक्रार करायचे, हेच सुचत नाही, अशा वेळी ‘संचार सारथी’ हे केंद्र सरकारचे ॲप तुम्हाला विनातक्रार वेळ न घेता कशी मदत करेल, याचे प्रात्यक्षिकच त्यांनी दिले. या वेळी प्रमोद सपकाळे यांनी प्रवाशांशी संवाद साधला. बसमध्ये जाऊनही माहिती दिली.
18 महिन्यांत चार कोटी मोबाईल नंबर केले बंद
विदेशातील 90 टक्के सायबर फ्रॉड शोधण्यात यश
हरविलेले 5 लाख 50 हजार हँडसेट शोधून दिले.
130 कोटींचे सायबर फ्रॉड रोखले.
देशात 25 लाख व्हॉट्सॲप अकाउंट बंद केले.
देशभरातील लोकांना 1200 कोटींची रक्कम परत केली.
महाराष्ट्रात चोरी झालेले 44 हजार मोबाईल शोधून परत केले.
स्वारगेट स्थानकावर प्रवाशांना ‘संचार सारथी’ ॲपची माहिती देताना डीओटीचे संचालक प्रमोद सपकाळे व स्वारगेट स्थानकप्रमुख बालाजी सूर्यवंशी.
संचार सारथी हे डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम म्हणजेच केंद्र सरकारचे असून, यावर कोणतीही तक्रार नोंद केली तर पंधरा दिवसांत त्याचा छडा लावला जातो. मोबाईल हरवला, सायबर चोरी झाली असेल तर या ॲपवर नोंद करा, पोलिस तक्रार असो-नसो, यावर सर्व माहिती तत्काळ अपलोड करा, तुमचे काम घरबसल्या होईल.
प्रमोद सपकाळे, संचालक, डीओटी, पुणे