

Pravin Gaikwad Case
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे शाईफेक करत हल्ला करण्यात आला. या प्रकरणी प्रवीण गायकवाड यांनी बुधवारी (दि. १६ जुलै) पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले. मास्टरमाईंड कोण? हे मी पुराव्यानिशी सांगितलं आहे. गुन्हेगाराला मुक्त सोडून माझ्या हत्येसाठी पाठवले, असा आरोप गायकवाड यांनी केला. ज्याचा बंदोबस्त करायचा त्याला जशास तसे उत्तर देणार, ही या सरकारच्या शेवटाची सुरुवात आहे. तुम्ही हल्लेच करणार असाल तर ती तुमची जबाबदारी आहे, असेही त्यांनी म्हटले.
दीपक काटे याने माझ्यावर हल्ला केला. या प्रकरणी आयोजकाकडून कुठलीही पोलिस तक्रार नोंदवली नाही. काटे याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे. त्याने स्वतःच्या भावाच्या खुनापासून शिक्षा भोगली आहे. त्याच्यावर जवळपास खंडणीपासून अनेक गंभीर गुन्हे आहेत. त्याला भाजपच्या युवा मोर्चाचे सरचिटणीसपद दिले आहे. बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष असताना दीपक कुटे त्यांच्यासोबत सतत दिसले असल्याचे सांगत गायकवाड यांनी तशा व्हिडिओ क्लीपही पत्रकार परिषदेत दाखवल्या.
विमानतळावर काटेला २ पिस्तूल, २८ काडतूसे सापडल्या प्रकरणी अटक झाली. अशा परिस्थितीत त्याला जामीन देता येत नाही, असे असताना तपास अधिकाऱ्याने न्यायालयात खोटी माहिती दिली. न्यायालयासमोर काटेची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आणली नाही. ज्या आरोपीला मोका लावणे गरजेचे आहे त्याला मुक्त सोडले गेले. मुक्त सोडल्यानंतर त्याने गंभीर स्वरुपाचा गुन्हा केला, असेही गायकवाड यांनी सांगितले.
पोलीस ऐकूण घेण्याच्या मनस्थितीत नाही. पोलिसांचा हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे, असा आरोपही त्यांनी केला. संघपरिवारात ज्या संघटनांचा बंदोबस्त करावा असे सांगितले. त्यात संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आणखी काही संघटना आहेत. '४०० पार, शत प्रतिशत भाजप'च्या आड आम्ही येतो म्हणून आमच्यावर हल्ला केल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला.