

Bawankule mastermind remark by Pravin Gaikwad
पुणे: माझ्यावर झालेला हा हल्ला पूर्व नियोजित कट रचून करण्यात आला असून हा सरकार पुरस्कृतच होता. दीपक काटे हा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे याना गॉड फादर मानत असल्याने तेच खरे मास्टर माईंड आहेत. सरकारने याबाबत गांभीर्याने दखल घेऊन आम्हाला न्याय देवा. अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिला.
या पत्रकार परिषदेला संभाजी ब्रिगेडचे सोलापूर जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, शाम कदम, सोमेश्वर अहिरे, रेखा कोंडे, प्रशांत कुंजीर यांसह पदाधिकारी उपस्थित होते. (Latest Pune News)
गायकवाड म्हणाले, माझ्यावर हल्ला करणाऱ्यांमध्ये काही बाहेरच्या राज्यातील लोक होते. काहीजण तर पॅरोलवर बाहेर असणारे लोक होते. त्याच्याकडे घातक शस्त्रे होती. माझ्यावरील हल्ला ही त्यांची निषेधात्मक कारवाई नव्हती, तर पूर्वनियोजित कट होता. तो सरकार पुरस्कृत होता. हल्लेखोरांवर अक्कलकोट पोलिसांनी साधारण अदखलपात्र गुन्हे नोंदवले.
राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, विधी न्याय मंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची ही नैतिक जबाबदारी असून त्यांनी ती स्वीकारावी. या सर्व प्रकरणाची चौकशी करून खरा मास्टरमाइंड असणाऱ्यांवर कारवाई करण्याचे धारिष्ट सरकारने दाखवावे. सरकार पुरस्कृत या हल्ल्याचा मी निषेध करणार नाही, पण संभाजी ब्रिगेडच्या इतिहासानुसार जशास तसे उत्तर नक्की देणार. लोकशाहीविरोधी विचारांच्या शेवटाची ही सुरुवात असल्याचा इशारा ही गायकवाड यांनी यावेळी दिला.
गायकवाड म्हणाले, माझ्यावर हल्ला केलेल्या दीपक काटे याच्यावर चुलत भावाचा खून केल्याचा आरोप असून त्याची शिक्षा ही त्याने भोगली आहे. त्याचबरोबर दोन पिस्तुल आणि 28 काडतुसंसह पकडला गेला होता. पण पोलिसांनी त्यामध्ये गांभीर्याने तपास न करता न्यायालयात खोटी माहिती देऊन त्याला जामीन बर बाहेर पडलेला आहे.
बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, वंचित बहुजन आघाडी यासारख्या संघटना संपविण्याचा घाट भाजप आणि आरएसएसने ठरविले असल्याने असे हल्ले केले जात आहेत. विचारांची लढाई विचाराने लढण्याची आमची तयारी आहे मात्र, तुम्ही आमच्यावर हल्ले केले तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा ही त्यांनी यावेळी दिला.