

मंचर: आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागातील साकारमाच (आहुपे) गावाच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव पुन्हा एकदा केंद्र सरकारकडे कायद्यातील तरतुदीनुसार येत्या आठ दिवसांत सादर करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारला दिले आहेत. त्यामुळे गेली अनेक वर्षे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या गावकर्यांच्या आशा त्यामुळे पल्लवित झाल्या आहेत.
साकारमाच (आहुपे) गावाच्या पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबई येथील मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री पवार होते. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षांपासून साकारमाच (आहुपे) गावाच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न सुरू आहेत. (Latest Pune News)
2014 साली माळीण गावाप्रमाणेच येथेही भूस्खलनाची शक्यता निर्माण झाली होती. त्यावेळी प्रशासनाने तातडीने गावकर्यांसाठी तात्पुरत्या निवारा शेडची व्यवस्था केली होती. त्यानंतर, वन विभाग (वन्य जीव) ठाणे यांच्यामार्फत पुनर्वसनाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. मात्र, केंद्र सरकारच्या धोरणांमधील काही बदलांमुळे या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नव्हती.
मुंबई येथे झालेल्या बैठकीमुळे साकारमाच गावाच्या पुनर्वसनासंदर्भात झालेल्या बैठकीला सचिव मदत पुनर्वसन, सचिव वन, सचिव अर्थ, जिल्हाधिकारी ठाणे, जिल्हाधिकारी पुणे, पीसीसीएफ नागपूराणे, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश घोलप, पंचायत समितीचे माजी सभापती संजय गवारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप चपटे, प्रवीण पारधी व साकारमाच (आहुपे) ग्रामस्थ कल्पेश येंधें, दीपक येंधें इत्यादी मान्यवर उपस्थित होते.