

Janmashtami temple events 2025
पुणे: फुलांची सजावट आणि विद्युतरोषणाई, दिवसभर असलेले वैविध्यपूर्ण धार्मिक कार्यक्रम अन् पारंपरिक पद्धतीने श्रीकृष्ण जन्मसोहळा... असे भक्तिपूर्ण वातावरण आज शुक्रवारी (दि. 15) मंदिरांमध्ये पाहायला मिळणार आहे.
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त ठिकठिकाणी तयारी पूर्ण झाली असून, मोठ्या उत्साहात आणि आनंदात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. भाविकांना दर्शनासाठी मंदिरे दिवसभर खुली राहणार असून, शुक्रवारी रात्री पारंपरिक पद्धतीने श्रीकृष्ण जन्मसोहळा साजरा करण्यात येईल.जय श्रीकृष्णच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमणार आहेत. (Latest Pune News)
शनिवारी (दि.16) गोपालकालाच्या निमित्तानेही मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहेत.दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीकृष्ण जन्माष्टमी मंदिरांमध्ये मोठ्या उत्साहात हर्षोल्हासात साजरी केली जाणार आहे. यानिमित्ताने शहरातील श्रीकृष्ण मंदिरांमध्ये विविध भजन - कीर्तन, व्याख्याने, प्रवचने असे धार्मिक- सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले असून, भाविकांना दिवसभर मंदिरात दर्शन घेता येणार आहे.
आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या (इस्कॉन) कात्रज कोंढवा रस्ता आणि कॅम्पमधील मंदिरांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव साजरा होणार आहे. शुक्रवारी (दि.15) आणि शनिवारी (दि. 16) सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे. मुख्य श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव शनिवारी (दि. 16) आहे. पहाटे साडेचार वाजता मंगल आरतीने सुरुवात होईल.
हरे- कृष्ण महामंत्राचे 24 तास कीर्तन चालू राहणार आहे. रात्री साडेनऊ वाजता भगवंतांना दूध- तूप- मध- फळांचा रस अशा विविध द्रव्यपदार्थांनी हरे- कृष्ण महामंत्राच्या घोषात अभिषेक करण्यात येईल. रात्री 11 वाजता भगवंतांना अनेक प्रकारचे अन्नपदार्थ- फळे- सुकामेवा- रस आदींचा नैवेद्य दाखविण्यात येईल. त्यानंतर मध्यरात्री 12 वाजता भगवंतांची आरती होईल. सुमारे पाच लाख भाविकांना प्रसादवाटपाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
अनेक मंडळे दहीहंडीसाठी सज्ज
गोपाळकालानिमित्त ठिकठिकाणी संस्था-संघटना, राजकीय पक्ष आणि मंडळांकडून दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. शनिवारच्या या उत्सवाची तयारीही जोमाने सुरू आहे. विविध गीतांच्या तालावर ठेका धरून तरुणाई उत्सवात सहभागी होणार असून, गोविंदा मोठ्या उत्साहात दहीहंडी फोडणार आहेत. तर काही संस्थांकडून विशेष मुले, दिव्यांग मुले, अनाथ मुलांसोबत दहीहंडी साजरी केली जाणार आहे.