

हडपसर : शहरालगत असलेल्या हडपसरमधील साडेसतरा नळी परिसरात काही वर्षांपासून विविध प्रकारची गुन्हेगारी व अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले आहे. सामान्य व प्रतिष्ठित नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
त्यासाठी नागरिकांनी येथे स्वतंत्र पोलिस चौकीची मागणी केली आहे. सध्या चौकीसाठीची जागा व त्यावरील लोखंडी खोल्याही तयार आहेत. मात्र, दोन-तीन महिने उलटूनही त्या ठिकाणी अद्याप कामकाज सुरू झालेले नाही. त्यामुळे नागरिकांमधून तीव नाराजी व्यक्त केली जात आहे.
या परिसरात दोन वसाहती व मोठ्या प्रमाणात बाहेरून रोजगारासाठी आलेला मजूर वर्ग आहे. त्यामुळे येथे अवैध दारू धंदे, मटका, जुगार व व्यसनी तरुणांचे प्रमाण अधिक वाढले आहे. यातून चोऱ्या व दहशतीचे प्रकारही घडत असून बाल गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. परिसरातील व्यावसायिक व सामान्य माणसांना त्याचा वारंवार त्रास सहन करावा लागत आहे.
आठवडाभरापूर्वी येथे एक तरूण भेटत नाही म्हणून त्याच्या मित्राला बोलावून दोन-तीन तरुणांनी कोयत्याने वार करून त्याला मोठ्या प्रमाणात जखमी केले होते. आपली दहशत दाखविण्यासाठी त्याचा व्हिडिओही समाज माध्यमावर प्रसारीत केला होता. तीन महिन्यांपूर्वी पाच-सहा तरुणांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाशेजारील परिसरात काही वाहने व दुकानांची कोयत्याने तोडफोड करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. याशिवाय या परिसरात मोठ्या प्रमाणात गावठी दारू, नशेची इंजेक्शन, बंटा, गुटखा, गांजा व नशा आणणारी पाने असे अवैध धंदे सुरू आहेत. पोलिसांकडून वारंवार कारवाई करूनही त्यावर नियंत्रण मिळवता आलेले नाही.
येथील पोलिस चौकी सुरू झाल्यास असे अवैध धंदे व गुन्हेगारी प्रवृत्तीला मोठा आळा बसेल, अशी नागरिकांना आशा आहे. मात्र, पोलिस चौकी उभारूनही ती सुरू का केली जात नाही, याबाबत त्यांच्याकडून शंका व्यक्त केली जात आहे.
साडेसतरा नळी परिसरात नागरिकरण व त्या सोबतच गुन्हेगारीही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी येथील पोलिस चौकीची वारंवार मागणी करून नागरिकांना सुरक्षित वातावरणाचे अपेक्षा केली आहे. आमदार चेतन तुपे व सिटी कॉर्पोरेशनचे अनिरुद्ध देशपांडे यांच्या पुढाकारातून चौकी स्थापनही केली आहे. मात्र, पोलिस प्रशासन तेथे कामकाज सुरू करण्यास टाळाटाळ का करत आहे, ते समजत नाही. चौकीत तातडीने कामकाज सुरू करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न पोलिसांनी करावा.
अमोल तुपे, अध्यक्ष, क्रांती शेतकरी संघ
येथील पोलिस चौकीसाठी सध्या आहे त्या जागेपेक्षा अधिक प्रशस्त जागेचा शोध सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना अशा काही जागांबाबत माहिती दिलेली आहे. त्यांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल. याशिवाय या भागात नियमित पोलिस पेट्रोलिंग सुरू असून बेकायदेशीर धंदे व इतर गुन्हेगारीवर नियंत्रण आणले जात आहे.
संजय मोगले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हडपसर पोलिस ठाणे
रामटेकडीत पोलिस चौकी सुरू व्हावी, यासाठी आठ वर्षांपूर्वी मी पत्रव्यवहार केला होता. आज तेथे तात्पुरत्या स्वरूपात चौकी सुरू केली आहे. त्याच पद्धतीने साडेसतरा नळी येथेही चौकी व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मांजरी बुद्रुकसाठी स्वतंत्र पोलिस ठाण्याची मंजुरी मिळालेली आहे. तेथील कामकाज सुरू झाल्यानंतर सध्याचा तेथे असलेला सर्व स्टाफ साडेसतरा नळी पोलिस चौकीसाठी मागता येईल. त्यानंतरच तेथे खऱ्या अर्थाने स्वतंत्र पोलिस चौकी होईल.
चेतन तुपे, आमदार