

शिवदास शितोळे
परिंचे: काय परिस्थिती आहे ही! महात्मा गांधींनी तर ‘खेड्यांकडे चला’ असं सांगितलं होतं. कारण, त्यांना वाटत होतं की, खेड्यांचा विकास झाला की देशाचाही विकास होईल. स्वातंत्र्यापासून आजपर्यंत केंद्र आणि राज्य सरकारांनी ग्रामीण विकासावर खूप भर दिलाय. हजारो कोटींचा निधी ग्रामीण भागातील लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी दिला जातो. (Latest Pune News)
पण, तरीही अनेक गावांमध्ये ‘गावचा विकास भकास झालाय’ आणि याला कारण आहे गावातील ‘चमको’ नेतृत्व. आजही अनेक गावं विकासाच्या प्रतीक्षेत आहेत, हजारो कोटींचा निधी येत असूनही, गावांचा सर्वांगीण विकास झाला आहे का? हा प्रश्न तपासावा लागण्याची गरज आहे. निवडणुका जवळ आल्या की प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता आणि गावनेता गल्लोगल्ली जाऊन नागरिकांच्या समस्या विचारतो. पण, निवडणुका संपल्या की हे ‘चमको’ नेते गायब होतात.
पावसाळ्यातल्या भूछत्रीप्रमाणे गावागावांत असे ‘चमको’ नेते मोठ्या संख्येने दिसू लागले आहेत. अनेक गावांमध्ये कार्यकर्त्यांपेक्षा नेते जास्त अशी अवस्था झाली आहे. काही गावांत तर सहा-सात पक्षांचे नेते आणि त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते मिळवण्यासाठी जीवघेणी स्पर्धा करतात.
त्यामुळे नेत्यांप्रमाणेच कार्यकर्तेही सकाळी एका पक्षात, दुपारी दुसर्या पक्षात, तर संध्याकाळी तिसर्याच पक्षात सक्रिय असतात. यामुळे कित्येक गावांतील गावकर्यांना ‘गावनेते विकणे आहे’ अशी जाहिरात द्यावी की काय? अशा चर्चा गावात ऐकायला मिळते. मध्यंतरी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या.
त्यांचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच, येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील ‘दादा, भाऊ, आप्पा, तात्या, शेठ, साहेब’ अशा अनेक नेत्यांचे ‘चमको चेले’ आमच्याच दादांची, आप्पांची कशी चलती आहे, हे सांगण्यात रक्ताचे पाणी करीत आहेत.
एखाद्या सर्वसामान्य नागरिकाकडे कधी ढुंकूनही न पाहणारे हे नेते निवडणूक जवळ आली की त्याच्या खांद्यावर हात टाकून ’काय हवं नको’ ते विचारतात. कधीकाळी आज्या-पंज्यांच्या काळात तुमच्या घरावर आमच्या घराचे कसे उपकार आहेत, हे पटवून देतात आणि सरतेशेवटी मतदान करण्यासाठी गुलाल, भंडार, बुक्का, गळ्यातील देवाचे ताईत, दोरी असे नाना हातखंडे वापरून भावनिक दबाव टाकतात. त्यामुळे निवडणुका आल्या की या नेत्यांमुळे गावकर्यांना ‘भीक नको; पण कुत्रा आवर’ अशी म्हणण्याची वेळ येते.