

पुणे: शस्त्रपरवान्याबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कठोर भूमिका घेतली असून, दीड वर्षात परवान्याची मागणी करणार्या लोकांचे तब्बल 404 अर्ज फेटाळण्यात आले आहेत. तर 104 व्यक्तींचे शस्त्र परवाने देखील रद्द केले असून, नव्याने केवळ फक्त 28 अर्जांना मंजुरी दिली आहे. त्यामध्ये दहा वारसा हक्क आणि नऊ खेळाडूंच्या कोट्यातील आहेत.
अमितेश कुमार यांनी पुणे पोलिस आयुक्त म्हणून पदभार घेताच पुणे शहरात देण्यात आलेल्या शस्त्र परवान्यांची पडताळणी केली. 1 जानेवारी 2024 ते 3 जून 2025 पर्यंतच्या कालावधीत पोलिसांकडे शस्त्र परवान्यासाठी 572 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 28 जणांच्या अर्जाला मंजुरी देण्यात आली आहे. तब्बल 404 अर्ज नाकारण्यात आले. (Latest Pune News)
तसेच, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 43 जणांचे परवाने रद्द करण्यात आले, तर नूतनीकरण न केल्यामुळे 97 परवाने रद्द करण्यात आले. एकूण 140 परवाने रद्द/रद्दबातल झाले आहेत. तर आणखी काही व्यक्तींना शस्त्र परवान्याबाबत कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आल्या आहेत.
मागील अनेक वर्षांपासून शस्त्र परवान्यासाठी नागरिकांनी केलेले अर्ज आयुक्तालयात प्रलंबित होते. त्याबाबत निर्णय घेण्यात आले नव्हते. अमितेश कुमार यांनी या सर्व अर्जाची निर्गती केली आहे. त्यामध्ये नागरिकांनी केलेले बहुतांश अर्ज अमान्य केले आहेत. अनेक अर्जदारांनी ’स्वसंरक्षणासाठी परवाना हवा’ असे कारण दिले होते.
मात्र, पोलिसांनी विनाकारण किंवा किरकोळ कारणांसाठी पिस्तूल परवाना देण्यास नकार दिला. पोलिस आयुक्तांचे धोरण स्पष्ट आहे, समाजात भीती निर्माण होईल, अशा पद्धतीने शस्त्र परवानगी देणार नाही. त्यामुळे पुण्यात शस्त्र परवान्यासाठी अर्ज करणार्यांना आता अधिक ठोस आणि जबाबदार कारणे द्यावी लागणार आहेत.