विश्रांतवाडी: श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे येत्या 19 जूनला आळंदी येथून प्रस्थान होणार असून, पालखी सोहळा विश्रांतवाडी परिसरातील म्हस्के वस्ती येथे दाखल होणार आहे. मात्र, विश्रांतवाडीतील मुख्य चौकात उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटरचे काम सुरू असल्याने हा रस्ता अतिशय अरुंद झाला आहे. त्यामुळे पालखीच्या दर्शनासाठी होणार्या अलोट गर्दीचे नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत विश्रांतवाडीतील वारीचा मार्ग खडतर होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विश्रांतवाडी, प्रतीकनगर, विद्यानगर, धानोरी, लोहगाव आणि परिसरातील हजारो भाविक व विविध जाती-धर्मांचे नागरिक हजारोंच्या संख्येने श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी विश्रांतवाडी चौकात येतात. (Latest Pune News)
वारीचे आगमन झाल्यानंतर विश्रांतवाडी चौक परिसरात पाय ठेवायलाही जागा शिल्लक नसते. विश्रांतवाडीत चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू असून, ग्रेडसेपरेटरच्या कामासाठी खोदकाम करण्यात येत आहे. वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी बॅरिकेड लावण्यात आले आहेत. त्यामुळे येथील मुख्य रस्ते अतिशय अरुंद झाले आहेत.
आळंदी रस्त्यावरील दुभाजकांचे रेलिंग अनेक ठिकाणी तुटले आहेत. पालखीदरम्यान आळंदी, टिंगरेनगर मुख्य रस्त्यावरील पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
माजी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले व विविध खात्यांच्या अधिकार्यांनी 19 जून रोजी पालखी मार्गाची पाहणी केली होती. या वेळी आयुक्तांनी संबंधित अधिकार्यांना महत्त्वाच्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.
सलग चौथ्या वर्षी महापौरांच्या अनुपस्थितीत पालखीचे स्वागत
परंपरेनुसार म्हस्के वस्ती येथे पुण्यनगरीचे महापौर, महापालिका आयुक्त तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी व महापालिकेचे अधिकारी यांच्या उपस्थितीत पालखीचे पुणे शहरात स्वागत केले जाते. मात्र 2022 पासून निवडणुकाच न झाल्याने या वर्षीही महापौरांच्या अनुपस्थितीत महापालिका आयुक्त पालखीचे स्वागत करतील. त्यामुळे किमान पुढच्या वर्षी तरी पुणे महापालिकेला महापौर मिळो, अशीच प्रार्थना राजकीय पदाधिकारी माउलींकडे करीत आहेत.
मार्गिका बदलावी लागणार?
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आळंदीहून पुण्याकडे मार्गक्रमण होत असताना विश्रांतवाडीत पालखी डाव्या बाजूने पुढे जाते. मात्र उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे व बीआरटीमुळे डावीकडील मार्गिका अतिशय छोटी झाली आहे. त्यामुळे यावर्षी पालखी उजव्या बाजूने न्यावी लागू शकते.
जिल्हाधिकार्यांनी साईट व्हिजिट केल्यानंतर प्रकल्प विभागाला बॅरिकेडिंग आत घ्यायला सांगितले आहे. रस्त्यावरील पार्किंगबाबतही पोलिस प्रशासनाला सूचना केल्या आहेत. रेलिंगबाबत उपाययोजना करण्यात येतील. शक्य त्या उपाययोजना करून वारीची व्यवस्था करण्यात येईल.
- अनिरुद्ध पावसकर, मुख्य अभियंता, पथ विभाग