पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक कार्यालयास नव्याने मिळालेल्या जागेवर पहिल्या टप्प्यातील कामकाज सुरू झाले आहे. वाहनांची योग्यता तपासणी या ठिकाणी करण्यात येत आहे. दररोज जवळपास 250 वाहनांची तपासणी विनाअडथळा होत आहे. सध्या सुरू असलेल्या आरटीओच्या जागेवरील तपासणीचा अडथळा दूर झाला आहे.
चिखली येथील (ता. हवेली) येथील गट नंबर 539 येथील पेठ क्रमांक 13 येथे चार हेक्टर जागा 'आरटीओ' कार्यालयासाठी देण्यात आली आहे. गायरानाची ती जमीन त्या नुसार सर्व प्रक्रिया पार पाडून ती ताब्यात देण्यात आली.
गेल्या दोन वर्षांपासून या जागेसाठी शासनाकडे आरटीओ विभाग पाठपुरावा करीत होता. या जागेवर ब्रेक टेस्ट ट्रॅक व वाहन योग्यता तपासणी करण्यात येणार आहे. तसेच, या ठिकाणी पार्किंग व इतर काही विभाग टप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत.
या बाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे म्हणाले की, नवीन जागा ताब्यात आल्यानंतर योग्यता प्रमाणपत्र तपासणीची प्रक्रिया या ठिकाणी 26 जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे. वाहतुकीचे अवजड वाहने याचे व्हिजल इन्स्पेक्शन या अंतर्गत सर्व तपास येथे करण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातंर्गत सध्या पिंपरी-चिंचवड, खेड, जुन्नर, लोणावळा, आंबेगाव, मावळ या ग्रामीण भागाचा समावेश होतो. त्यात या नव्या जागेत परिवहन कार्यालय सुरू करण्याचा मानस परिवहन मंत्री अनिल परब यांनी बोलून दाखवला होता. त्यामुळे आरटीओचे विस्तारीकरण होणार असल्याचे बोलले जात आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दोन ब्रेक टेस्ट ट्रॅकसाठी दोन हेक्टर जागेची गरज आहे. तसेच नवीन वाहन तपासणी, योग्यता तपासणी, हेड लाईट, वाहन तपासणी, पार्किंग, अधिकारी व कर्मचार्यांना उभे राहण्यासाठी जागा यासाठी ही जागा वापरात येणार आहे.