पुणे
Pune Rto News : आरटीओ अधिकार्याची नेमबाजीत कामगिरी
पुणे; पुढारी वृत्तसेवा : सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) सुजित सुदामसिंग डोंगरजाळ यांची नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआय) नवी दिल्ली आयोजित 66 व्या राष्ट्रीय नेमाबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी (2023) निवड झाली आहे. कार्यालयीन कामातून वेळ मिळाला की ते आपला हा छंद जोपासतात. त्यातूनच त्यांना हे यश मिळाले आहे.
सुजित डोंगरजाळ हे मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथील बेंदवाडी गावातील रहिवासी, ते शेतकरी कुटुंबातील असून, सध्या ते पुणे आरटीओ कार्यालयात कार्यरत आहेत. आरटीओतील कामाकाजातून वेळ मिळाला की,डोंगरजाळ हे आपला छंद जोपासतात. त्यांनी 'एअर पिस्टल शूटिंग'चे प्रशिक्षण पिंपळे सौदागर येथे घेतले आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये त्यांची सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून नागपूर येथे प्रथम नियुक्ती झाली. त्यांना नेमबाजीचा छंद जोपासण्यासाठी त्यांच्या पत्नीचा मोठा पाठिंबा असतो, त्या डॉक्टर आहेत. छंद जोपासण्यासाठी घरातून मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे नेमबाजी स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्यांचा उत्साह अधिक द्विगुणित झाला आहे, असे डोंगरजाळ यांनी सांगितले.
'दहा मीटर एअर पिस्टल' नेमबाजी स्पर्धेसाठी त्यांनी सुरुवातीला राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेऊन विजय मिळविला. त्यानंतर विभागस्तरीय स्पर्धा भोपाळ येथे झाली. तेथेही त्यांनी अव्वल कामगिरी केली. आता ते येत्या नोव्हेंबर/डिसेंबर 2023 या महिन्यात मध्य प्रदेशमधील आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्टेडियम-भोपाळ येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेणार आहेत. त्यांची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे. याबाबतचे पत्र (एनआरएआय) नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्याकडून नुकतेच देण्यात आले आहे.
लहानपणापासूनच नेमबाजीची आवड आहे. त्यामुळे सुरूवातीला मी प्रशिक्षण घेतले. त्यामाध्यमातून स्पर्धेबाबत माहिती झाली. त्यात भाग घेत हे यश मिळाले आहे. याकरिता माझे प्रशिक्षक, कार्यालयीन सहकारी वरिष्ठांची मोठी मदत मिळते. यात महत्वाचे म्हणजे माझ्या पत्नीचा मोठा पाठींबा हा नेमबाजीचा छंद जोपासण्यासाठी मिळतो.– सुजित डोंगरजाळ,सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
हेही वाचा

