

पुणे: राज्यातील शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील 25 टक्के राखीव जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता 8 मेपर्यंत पालकांना कागदपत्र पडताळणी करून प्रवेश घेता येणार आहे. दरम्यान, गुरुवारी सायंकाळपर्यंत सुमारे 72 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठीची आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यंदा राज्यातील 8 हजार 701 शाळांमध्ये 1 लाख 14 हजार 826 जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत. त्यासाठी 2 लाख 89 हजार 286 अर्ज दाखल झाले.
6 एप्रिल रोजी प्रवेशासाठीची सोडत काढण्यात आली. त्यानंतर 10 एप्रिल रोजी निवड यादी जाहीर करून निवड यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू करण्यात आले. त्यानंतर 20 एप्रिल रोजी मुदतवाढ जाहीर करून 30 एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.