

पुणे: महाराष्ट्रात प्रत्येक क्षेत्रात महान कर्तृत्व गाजवलेली माणसे आहेत. अनेक महान व्यक्तींचे मोठेपण जगाला कळले; पण दुर्दैवाने महाराष्ट्राला कळले नाही. मराठी माणसे, मराठी भाषेची ताकद आपण विसरत आहोत. मराठी माणूस म्हणून आपण एकत्र येऊ नये, याचा व्यवस्थित बंदोबस्त करून ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्राचे वाटोळे करण्यास राजकारणी कारणीभूत आहेत, अशी घणाघाती टीका
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. राज्यकर्ते बिल्डर आणि उद्योजकांना शरण गेले आहेत, असेही ते म्हणाले.
वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेमध्ये ‘माझ्या मनातला महाराष्ट्र, मराठी अस्मिता’ या विषयावर ठाकरे बोलत होते. आम्ही मराठी शिकणार नाही, असे अमराठी रिक्षावाले म्हणत असताना आपले मंत्री त्यांना चार महिन्यांची मुदत देतात. गॅस तुटवडा असताना केवळ जैन लोकांना आम्ही सिलिंडर देऊ, असेही एक मंत्री म्हणतात. तरी मराठी माणूस म्हणून आपण काहीच भूमिका घेत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
ठाकरे म्हणाले, ‘कोणी क्रिकेट, तर कोणी सोशल मीडियात रमले आहे. साधी भोळी माणसे भोंदू साधूच्या भूलथापांना बळी पडत आहेत. त्यामुळे मूळ गोष्टींकडे दुर्लक्ष झाले आहे. एकीकडे मराठीला अभिजात दर्जा मिळाला असताना हिंदी भाषेच्या सक्तीबाबत अपल्याकडे वाद होतात.
भारतात अनेक राज्यांतील नागरिक भाषेबाबत अत्यंत कडवट आहेत. आपण भाषेचा अभिमान कधी बाळगणार? प्रत्येक मराठी माणसाने आपल्या मराठी भाषेतूनच व्यक्त झाले पाहिजे. मराठीतच भांडा, मराठीतच बोला. समोरचा माणूस आपोआप मराठी बोलायला लागेल.’
इतिहास सनसनावळीसाठी वाचायचा नसतो. त्यातून बोध घ्यायचा असतो. आपल्याकडे केवळ महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी साजरी केली जाते, पुतळ्यांना हार घातले जातात. आपण महापुरुषांना जातीपातीमध्ये विभागले आहे. मात्र, त्यांनी आपल्याला काय शिकवले, याचा विसर पडल्याने महाराष्ट्राची ही अवस्था झाली आहे. आम्ही कोण होतो, काय आहोत, ताकद काय होती याचा आपल्याला विसर पडला आहे. सध्या शहरांमध्ये भीषण परिस्थिती पाहायला मिळत आहे. इमारती वेगाने उभ्या राहत आहेत. बिल्डरांनी शहराचा ताबा घेतला आहे. राज्यकर्ते बिल्डर आणि उद्योगपती यांना शरण गेले आहेत. सामान्य नागरिकांच्या हातात काहीही उरलेले नाही.
- राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे